पोलिस आयुक्तांनी परवानगी नाकारल्याने गुंडाळला ‘म्युझिक फेस्टिवल’, सूस येथे केले होते आयोजन
By नारायण बडगुजर | Updated: December 15, 2024 21:12 IST2024-12-15T21:12:16+5:302024-12-15T21:12:32+5:30
Pimpri News: सूस येथील तिर्थ फिल्डस येथे ‘एन एच ७ या म्युझिक फेस्टीवल परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी परवानगी नाकारली. त्यामुळे आयोजकांना हा फेस्टिवल गुंडाळावा लागला.

पोलिस आयुक्तांनी परवानगी नाकारल्याने गुंडाळला ‘म्युझिक फेस्टिवल’, सूस येथे केले होते आयोजन
- नारायण बडगुजर
पिंपरी - सूस येथील तिर्थ फिल्डस येथे ‘एन एच ७ या म्युझिक फेस्टीवल परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी परवानगी नाकारली. त्यामुळे आयोजकांना हा फेस्टिवल गुंडाळावा लागला.
बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत सूस येथे १४ व १५ डिसेंबर रोजी नाँडविन गेमिंग यांच्यातर्फे आयोजित ‘एन एच ७ विकएन्डर’ या म्युझिकल फेस्टीवलसाठी आयोजक गिरीष शिंदे यांनी परवानगी मागितली होती. त्यांना दोन महिन्यांपूर्वी बावधन पोलिस ठाणे व परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त कार्यालयाकडून परवानगी देता येणार नसल्याचे कळविले होते. या ठिकाणी रहिवासी भाग आहे. जेष्ठ नागरिक व आयटी क्षेत्रात काम करणारे वास्तव्यास आहेत. मुंबई-बेंगळूर महामार्गापासून ते सूस येथील तिर्थ फिल्डसपर्यंत एकेरी वाहतूक आहे. त्यामुळे या ठिकाणी कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडी होते. यापूर्वी अशाच एका कार्यक्रमावेळी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास झाला होता. कार्यक्रम परिसर हा उंचावर असल्याने व बाजुला असलेल्या रहिवासी भागात म्युझिक फेस्टिवलमधील लाउडस्पिकरच्या आवाजाने व एलईडी लाईटमुळे सार्वजनिक उपद्रव निर्माण झाला होता. त्यामुळे परवानगी देता येणार नाही, असे पोलिसांनी कळविले होते.
परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, वाहतूक शाखेचे उपायुक्त बापू बांगर व वाकडचे सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी स्थळ पाहणी केली होती. कार्यक्रमाला परवानगी देणे शक्य नसल्याबाबत त्यांनी सांगितले होते.
एक्साइजनेही नाकारली परवानगी
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी म्युझिकल फेस्टिवलला परवानगी नाकारली. तसेच राज्य उत्पादन शुल्क (एक्साइज) विभागानेही दारूचा (लिकर) परवाना दिला नाही. एक्साइजचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी परवानगी नाकारली. प्रशासनाची परवानगी असल्याखेरीज कार्यक्रम घेता येणार नाही, असे जागा मालकानेही आयोजकांना सांगितले.
पीएमआरडीए मैदानावर आयोजन करावे
कार्यक्रमाच्या आयोजनामुळे स्थानिक रहिवासी तसेच वाहनचालकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. त्यासाठी पीएमआरडीएच्या मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या मैदानावर कार्यक्रम घेण्यास पोलिसांनी सुचविले होते.
आयोजकांनी कार्यक्रमाचे ठिकाण घोषित करण्यापूर्वी पोलिस विभागाशी समन्वय साधावा. त्यानंतर परवानगी घेऊनच कार्यक्रमाचे ठिकाण निश्चित करावे. पोलिस प्रशासन योग्य ते कायदेशिर सहकार्य करील.
- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड