स्टेटसला लाइक करून फोटो शेअर केल्याने तरुणाचा खून; दृश्यम स्टाइलने दिशाभूल करण्याचा प्रयत्न

By नारायण बडगुजर | Published: March 26, 2024 03:49 PM2024-03-26T15:49:13+5:302024-03-26T15:50:24+5:30

पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करत खून प्रकरणाची उकल केली...

Murder of youth by liking status and sharing photo, trying to mislead with visual style | स्टेटसला लाइक करून फोटो शेअर केल्याने तरुणाचा खून; दृश्यम स्टाइलने दिशाभूल करण्याचा प्रयत्न

स्टेटसला लाइक करून फोटो शेअर केल्याने तरुणाचा खून; दृश्यम स्टाइलने दिशाभूल करण्याचा प्रयत्न

पिंपरी : खून झालेल्याचा फोटो १८ वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर स्टेटस ठेवला. या रागातून अपहरण करून त्याचा खून केला. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ‘दृश्यम स्टाईल’ने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करत खून प्रकरणाची उकल केली.  

आदित्य युवराज भांगरे (१८, रा. भांगरे वस्ती, महाळुंगे, ता. खेड), असे खून झालेल्याचे नाव आहे. परिमंडळ तीनचे पाेलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी खेड तालुक्यातील रासे फाटा येथे मराठा हॉटेलमध्ये हॉटेल मालक स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे याच्यावर हॉटेलमध्ये घुसून काही जणांनी गोळीबार केला. त्यात स्वप्नील शिंदे जखमी झाला. याप्रकरणी राहुल पवार (रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड), अजय गायकवाड आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात पोलिसांनी सुरुवातीला अजय गायकवाड याला अटक केली. त्यानंतर अमर नामदेव शिंदे (२५, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) याला २३ मार्च रोजी अटक केली. यातील मुख्य संशयित राहुल पवार फरार आहे.

राहुल पवार याचा भाऊ रितेश पवार याचा तीन महिन्यांपूर्वी खून झाला. त्या गुन्ह्यात स्वप्नील शिंदे याचा सहभाग असल्याचा संशय राहुल पवार याला होता. त्यामुळे त्याने अभिजित सदानंद मराठे (रा. कोथरूड, पुणे) आणि इतर साथीदारांसोबत मिळून स्वप्नीलवर गोळीबार केला. मात्र त्यापूर्वी दोन दिवस अगोदर म्हणजेच १६ मार्च रोजी संशयितांनी आदित्यचा खून केला असल्याचे समोर आले.   

राहुल पवार याचा भाऊ रितेश पवार याचा खून झाल्यानंतर त्याचे खुनाचे छिन्नविच्छिन्न फोटो सोशल मीडियावर काही जणांनी शेअर केले. त्याला लाइक करून आदित्य भांगरे याने ते फोटो स्टेट्सला ठेवले. त्या रागातून राहुल पवार याने दोन साथीदारांसोबत मिळून आदित्यचे चारचाकी वाहनामधून अपहरण केले. त्याला मारहाण करून वायरने गळा आवळून त्याचा चारचाकीमध्येच खून केला. आदित्य बेपत्ता झाल्याची तक्रार महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल होती.  

चाकण विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, महाळुंगे एमआयडीसीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष कसबे, सहायक निरीक्षक कल्याण घाडगे, उपनिरीक्षक नामदेव तलवाडे, संतोष जायभाय, सहायक फौजदार सुरेश हिंगे, पोलिस अंमलदार भैरोबा यादव, संदीप सोनवणे, राजू जाधव, हनुमंत कांबळे, निखील शेटे, नितीन गुंजाळ, सुनील भागवत, संदीप गंगावणे, अशोक दिवटे, प्रदीप राळे, निखील वर्पे, महेश कोळी, माधुरी कचाटे, राजेंद्र कोणकीरी, अमोल बोराटे, तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, अजय गायकवाड, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, शरद खैरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 अपहरणाचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले अन् उकल झाली

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी संशयितांनी आदित्य भांगरे याचा खून करून त्याचे पुरावे नष्ट केले. त्यांनी खेड तालुक्यातील निमगाव येथे निर्जन स्थळी काहीतरी जाळले. तिथे आदित्यचा मृतदेह जाळल्याचा बनाव केला. तसेच आदित्यचा मोबाईल फोन गोवा येथे एका संशयितासोबत पाठवला. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणात आदित्य गोवा येथे असल्याचे दिसत होते. निमगाव येथे तसेच गोवा येथे देखील आदित्यचा मृतदेह अथवा त्याबाबत कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. मृतदेह सापडला नाही तर त्याचा न्यायालयात फायदा होईल, असा विचार संशयितांनी केला होता. मात्र संशयितांनी आदित्यचे अपहरण झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवले. त्यावरून संशयितांचा माग काढला.  

मृतदेहाची डीएनए तपासणी

संशयितांनी आदित्य भांगरे याला गाडीतच ठार मारून त्याचा मृतदेह महाराष्ट्र-गुजरात सीमेवर नेला. सीमेवरील गुजरातमधील वेलवाडा येथे जंगल परिसरात मृतदेह जाळला. पोलिसांनी तेथून अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह ओळख पटविण्याच्या अवस्थेत नसल्याने डीएनए तपासणी होणार आहे.

Web Title: Murder of youth by liking status and sharing photo, trying to mislead with visual style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.