पिंपरी : केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील हवा शुद्ध करण्याच्या उपाययोजना करण्यासाठी १७२.९७ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका यांच्याकडून पीएमपीएमएलसाठी १०० ईव्ही आणि १०० सीएनजी गॅस बसेस खरेदीचे नियोजन आहे. त्यापैकी ६० टक्के बसेस पुणे आणि ४० टक्के बसेस पिंपरी-चिंचवडला मिळणार आहेत. त्यानुषंगाने १४ बसेससाठी सात कोटींचे अनुदान वर्ग करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
स्थायी समिती आणि महापालिका सभा यांची मान्यता आवश्यक असलेले विषय आयुक्त सिंह यांच्या मान्यतेसाठी गुरुवारी (दि.१६) झालेल्या विशेष बैठकीत ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर उपस्थित होते.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा अधिकाधिक वृद्धिंगत करून रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांची निरंतर उपलब्धता राहावी या दृष्टिकोनातून नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स (एनबीइएमएस) नवी दिल्लीमार्फत महापालिकेच्या रुग्णालयात एनबीइएमएस पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन होते.त्यानुसार भोसरी व थेरगाव रुग्णालयास उपलब्ध पायाभूत सोयीसुविधा व मनुष्यबळ यांच्या मानांकनानुसार पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींकडून घ्यावयाचे प्रवेश शुल्क, वसतिगृह शुल्क आणि त्यांना अदा करावयाचे विद्यावेतन याबाबतच्या विषयास सिंह यांनी मान्यता दिली.