टँकरलॉबीचा महापालिकेला ठेंगा
By Admin | Updated: July 19, 2014 03:21 IST2014-07-19T03:21:50+5:302014-07-19T03:21:50+5:30
टँकरचे पाणी हद्दीबाहेर जाऊ नये म्हणून टँकरला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) बसविण्यासाठी महापालिकेने केलेल्या सक्तीला शहरातील टँकरमालकांनी विरोध केला आहे.

टँकरलॉबीचा महापालिकेला ठेंगा
पुणे : एकीकडे पुणेकरांना दिवसाआड पाणी मिळत असताना, टँकरचे पाणी हद्दीबाहेर जाऊ नये म्हणून टँकरला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) बसविण्यासाठी महापालिकेने केलेल्या सक्तीला शहरातील टँकरमालकांनी विरोध केला आहे. अवघ्या आठ हजार रुपयांची ही यंत्रणा आपल्याला परवडत नसल्याचे सांगून या टँकरमालकांनी सोमवारपासून टँकरचा पाणीपुरवठा बेमुदत बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आधीच पाणीकपातीने हैराण झालेल्या पुणेकरांच्या मनस्तापात भरच पडणार आहे. पाणीकपातीमुळे शहरात रोज ५५० टँकरच्या फेऱ्या होतात.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाण्याने तळ गाठल्याने महापालिकेतर्फे शहरात गेल्या आठवडाभरापासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ही पाणीकपात करतानाच, महापालिकेने शहरातील बांधकामे बंद करण्याबरोबरच जलतरण तलाव, वॉशिंग सेंटरही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपाययोजना करतानाच शहरातील पिण्यासाठीचे पाणी बांधकामे तसेच हद्दीबाहेर विकले जाऊ नये म्हणून टँकरला जीपीएस बसविण्याचा निर्णयही पालिकेने घेतला. तसेच, २१ जुलैपर्यंत ही यंत्रणा बसविण्यास टँकरमालकांना मुदत देण्यात आली. मात्र, ही यंत्रणा महागडी असल्याचे आणि आधी महापालिकेने आपल्या टँकरना जीपीएस बसवावी व मग आम्हाला सक्ती करावी, अशी मागणी टँकरमालकांच्या प्रतिनिधींनी पाणीपुरवठा विभागाकडे केली.
तसेच, महापालिकेने सक्ती केल्यास येत्या सोमवारपासून शहरातील टँकरद्वारे पुरविण्यात येणारे पाणी बंद करण्याचा इशारा पाणीपुरवठा अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत टँकरमालकांनी दिला आहे.(प्रतिनिधी)