- नारायण बडगुजरपिंपरी : मावळ आणि शिरूर मतदारसंघात महायुतीच्या उमदेवारांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रचार करण्यात येत आहे. असे असले, तरी महाआघाडीला पाठिंबा देण्याबाबत त्यांना आदेशाची प्रतिक्षा आहे. तोपर्यंत मनसे कार्यकर्त्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. मात्र, राष्ट्रवादीकडूनही पिंपरी-चिंचवडमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना पाठिंब्यासाठी गळ घातली जात आहे.लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसलेल्या मनसेने गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आपली राजकीय भूमिका जाहीर केली. देश नरेंद्र मोदीमुक्त करा, असे आवाहन करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीविरोधात प्रचार करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे राज्यभरात भाजपा आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवारांविरोधात मनसे कार्यकर्त्यांकडून प्रचार करण्यात येत आहे. त्यासाठी कोपरा सभा, स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. पत्रकांतूनही त्याबाबतचा प्रचार करण्यात येत असून, महायुतीला पराभूत करण्यासाठी इतर पक्षांच्या उमेदवारांना मतदान करा, असे मतदारांना आवाहन केले जात आहे.पिंपरी-चिंचवडमध्येही मनसेकडून महायुतीविरोधात प्रचार होत आहे. गुढीपाडव्याला झालेल्या मेळाव्यानंतर त्याला वेग आला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याच्या सूचना देण्यात आल्या. मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड आणि पिंपरी, तर शिरुर लोकसभा मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मावळ आणि शिरुर मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर महाआघाडीकडून दोन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या दोन्ही मतदारसंघांत महायुती अर्थात शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात मनसेकडून प्रचार केला जात आहे. तसेच मनसेकडून महाआघाडीचा प्रचार होत असल्याचीही चर्चा आहे. मात्र मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही बाब नाकारली.
मनसेचा युतीला विरोध तर आघाडीबाबत तटस्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 23:34 IST