तुटीच्या अर्थसंकल्पाची ओढवणार नामुष्की?

By Admin | Updated: January 23, 2016 02:28 IST2016-01-23T02:28:58+5:302016-01-23T02:28:58+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेला २०१५-१६ या आर्थिक वर्षात २ हजार ३१५ कोटी रुपये जमा होण्याचा अंदाज आहे. मात्र, वर्ष संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक असताना

Misconceptions of budget deficit? | तुटीच्या अर्थसंकल्पाची ओढवणार नामुष्की?

तुटीच्या अर्थसंकल्पाची ओढवणार नामुष्की?

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला २०१५-१६ या आर्थिक वर्षात २ हजार ३१५ कोटी रुपये जमा होण्याचा अंदाज आहे. मात्र, वर्ष संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक असताना अद्यापपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत १ हजार ६२९ कोटी जमा झाले आहेत. त्यामुळे आणखी सातशे कोटी रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे, असे न झाल्यास तुटीचे अंदाजपत्रक सादर करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळकत कर वसुलीत पीछेहाट, एलबीटी अनुदानात कपात, पाणीपट्टीची थकबाकी यांमुळे अपेक्षित रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होत नाही. तर दुसरीकडे विकासकामे राबविण्याच्या नावाखाली घेण्यात येणारी कोटीच्या कोटी उड्डाणामुळे महापालिकेचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
महापालिकेने या आर्थिक वर्षात २ हजार ३१५ कोटी रुपये जमेचा अंदाज धरला होता. मात्र, विविध कारणास्तव ही रक्कम वसूल करण्यात प्रशासनाला अपयश असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील वर्षातील अंदाजपत्रक तुटीचे सादर करण्याची वेळ येते की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या आर्थिक वर्षात स्थानिक संस्था कराच्या माध्यमातून आत्तापर्यंत १ हजार चाळीस कोटी ९७ लाख रुपये जमा झाले आहेत. तर करसंकलन विभागात २४० कोटी ५७ लाख, तर लेखा विभागातून ३३ कोटी ४४ लाख ७६ हजार जमा झाले आहेत. भांडवली जमा ४० कोटी ४८ लाख ६७ हजार इतकी आहे. इतर २७ कोटी ९३ लाख ४१ हजार रुपये जमा आहेत.
एलबीटीच्या बदल्यात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात शासनाने कपात केली. यामुळे महापालिकेला निधीची कमतरता भासणार आहे. दरमहा शासनाकडून ६६ कोटींचे अनुदान मिळत होते. यामध्ये १९ कोटींनी कपात केल्याने आता केवळ ४७ कोटी रुपये मिळणार आहेत.
मिळकत कराच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात ५१७ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी पावणेतीनशे कोटी वसूल झाले. उर्वरित अडीचशे कोटींच्या वसुली पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेसमोर असणार आहे.
पाणीपट्टीची ३१ मार्च २०१४अखेर ४५ कोटींची असलेली थकबाकी मार्च २०१५अखेर ४१ कोटी होती. ही थकबाकी वसूल करणेही गरजेचे बनले आहे. महापालिकेच्या यंत्रणेला वसुलीसाठी कंबर कसावी लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Misconceptions of budget deficit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.