लघुउद्योजक हैराण
By Admin | Updated: July 24, 2015 04:29 IST2015-07-24T04:29:46+5:302015-07-24T04:29:46+5:30
एमआयडीसी भागात वारंवार वीज खंडित होत असल्याने लघुउद्योजक वैतागले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून वीजवितरण कंपनीचा हा खेळखंडोबा सुरू आहे

लघुउद्योजक हैराण
पिंपरी : एमआयडीसी भागात वारंवार वीज खंडित होत असल्याने लघुउद्योजक वैतागले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून वीजवितरण कंपनीचा हा खेळखंडोबा सुरू आहे. वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वेळेत दखल घेतली जात नाही. समस्या निवारणासाठी सुरू केलेल्या ‘टोल फ्री’ क्रमांकामुळे समस्येत अधिक भर पडली आहे. टोल फ्री क्रमांकावरुन एसएमएस आल्याशिवाय दुरुस्ती करता येत नसल्याचे उत्तर देऊन वीज कर्मचारी हात झटकतात. त्यामुळे टोल फ्री क्रमांकाने समस्येत अधिक भर पडली आहे.
वीज केंद्रास फोन केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले जाते. अनेकदा फोनचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवला जातो. त्यामुळे संपर्कच करता येत नाही. टोल फ्रीचे केंद्र मुंबईत आहे. तो क्रमांक सतत बंद असतो. अनेकदा कॉल केल्यानंतर संपर्क होतो. कॉल सेंटरवरून संबंधित वीज केंद्राला एसएमएसद्वारे कळविले जाते. मात्र, अनेकदा त्यावर ठोस कारवार्ई केली जात नाही. या पद्धतीमुळे वेळ भरपूर जातो. जवळच केंद्र असताना टोल फ्रीला संपर्क करण्याची सक्ती केली जात असल्याने समस्या निवारणास अधिक वेळ जात आहे. त्यात येथील वीजजोडणी यंत्रणा आणि साहित्य ७ वर्षांपूर्वीचे आहे. ते कालबाह्य झाल्याने वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
मनुष्यबळ कमी आहे. त्यातही कर्मचारी कंत्राटी असल्याने त्यांना कामाचे गांभीर्य आणि जबाबदारीची जाणीव नाही. या संदर्भात मुख्य कार्यालय, मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांकडे वारंवार तक्रार करूनही विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे लघुउद्योजक हैराण आहेत. वीज का केली, कधी येणार हे विचारल्यास ब्रेक डाऊन आहे. ट्रान्सफॉर्मर जळाला आहे. केबल दुरुस्ती सुरू आहे. दुरुस्ती काम सुरू आहे, अशी उत्तरे देऊन टोलवाटोलवी केली जाते. जबाबदारी टाळण्यासाठी टोल फ्री क्रमांकाचा आधार कर्मचारी आणि अधिकारी
वर्ग घेत असल्याने दुरुस्ती वेळेत
होत नाही. त्यामुळे उद्योजकांना वीज खंडित होण्याचा फटका सहन करावा लागत आहे.
भोसरी, चिंचवड, तळवडे, चिखली, कुदळवाडी, लांडेवाडी, थेरगाव, पिंपरी या भागात सुमारे ८ हजार लहान-मोठे लघुउद्योग आहेत. यावर लाखो जण अवलंबून आहेत. या भागात दोन महिन्यांपासून अचानक वीज गायब होत आहे. दिवसांतून २ ते ४ वेळा वीज ये-जा होण्याचा लपंडावच सुरू आहे. एकदा वीज गेल्यास ती ५ मिनिटांत येते किंवा २ ते ३ तासांनी येते. कधी कधी दुसरा दिवस उजाडतो. अचानक वीज गेल्याने यंत्रे बंद पडतात. त्यामुळे कामगारांना कामाविना बसून राहावे लागते.
या संदर्भात पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष नितीन बनकर यांनी सांगितले, ‘‘एमआयडीसी भागातील विजेची यंत्रणा जुनाट झाली आहे. त्यामुळे वारंवार वीज जाते. त्याचा फॉल्ट लवकर समजत नसल्याने दुरुस्ती वेळेत होत नाही. मनुष्यबळ कमी असल्याचे रडगाणे कायम सांगितले जाते. टोल फ्री क्रमांक देऊन या समस्येत भर घातली आहे. नेहमीच वीज जात असल्याने कामगारांना बसून पगार द्यावा लागतो. उत्पादनात घट होत आहे. नाईलाजास्तव हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.’’
तळवडे येथील लघुउद्योजक नीरज मंत्री यांनी सांगितले, ‘‘वीज कधी जाते, तर कधी जात नाही. वीज गेल्यास ती परत कधी येईल, हे सांगता येत नाही. वीज दिवसातून ५ ते ६ वेळा जाते. वीज केंद्राकडे तक्रार केल्यास कोणी जबाबदारी घेत नाही. अनेकदा रिसिव्हर बाजूला काढून ठेवला जातो. वारंवार वीज जात असल्याने वैताग आला आहे.’’
भोसरी व तळवडे येथील लघुउद्योजक शिवाजी साखरे यांनी सांगितले, ‘‘वीज सतत जात असल्याने कंपन्यांचे आॅर्डर वेळेत पूर्ण करता येत नाही. त्यामुळे कंपन्यांचा दबाव वाढत आहे. त्यात कामगारांना बसून पगार द्यावा लागतो. भरमसाट बिल न चुकता येते. मंदीच्या काळात तग धरून, कर्ज काढून उद्योग चालवीत आहेत. कामगारांचा पगार देणेही अनेकदा अवघड होऊन बसते. लघुउद्योजक डबघाईला आला आहे.’’ (प्रतिनिधी)