यंत्रणा आहे; मनुष्यबळ कमी!
By Admin | Updated: February 29, 2016 00:56 IST2016-02-29T00:56:11+5:302016-02-29T00:56:11+5:30
महापालिकेच्या अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक वाहनांसह इतर यंत्रणा असली, तरी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे त्या यंत्रणेचा उपयोग होत नाही.

यंत्रणा आहे; मनुष्यबळ कमी!
पिंपरी : महापालिकेच्या अग्निशामक दलाकडे अत्याधुनिक वाहनांसह इतर यंत्रणा असली, तरी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे त्या यंत्रणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी निर्माण होत आहे.
महापालिकेचे क्षेत्रफळ १७७ चौरस किलोमीटर असून, शहराची लोकसंख्या २० लाखांवर पोहोचली आहे, तर शहरात सुमारे सात हजार उद्योग-धंदे आहेत. कुदळवाडी, भोसरी, चिंंचवडसह शहराच्या विविध भागांत छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. या परिसरात वारंवार आगीच्या घटना घडत असतात. त्यामुळे महापालिकेची अग्निशामक यंत्रणाही तितकीच सक्षम असणे गरजेचे आहे.
मात्र, इतक्या मोठ्या शहरात आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी केवळ चार अग्निशामक केंदे्रआहेत. त्यामुळे केंद्रापासून दूर अंतरावर असलेल्या घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी जास्त अवधी लागतो. यामुळे घटनेची गांभीर्यता वाढू शकते. त्यामुळे केंद्रांचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. दरम्यान, आणखी आठ केंद्र उभारण्याची मागणी होत आहे.
यासह मनुष्यबळही अपुरे पडत आहे. सध्या अधिकारी व कर्मचारी मिळून १३० जण आहेत. यासह आणखी दीडशे कर्मचाऱ्यांची गरज भासत आहे. मात्र, त्या तुलनेत कर्मचारी नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वाहनचालक निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत; तर अनेक कर्मचारी असे आहेत की, वयोमानानुसार घटनेच्या वेळी त्यांना धावपळ करणेही शक्य होत नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतर वाहनांसह सर्व यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचते. मात्र, आगीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जागा अपुरी असल्यास अथवा उंच इमारतीवर आग असल्यास अधिकाधिक कर्मचाऱ्यांची गरज भासते. त्यामुळे इतर यंत्रणा असूनही त्याचा उपयोग होत नाही. मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी वारंवार मागणी होत असतानाही अद्याप उपलब्ध करून दिले जात नाही. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. (प्रतिनिधी)