प्रजासत्ताक दिनानिमित्त दक्षतेच्या उपाययोजना
By Admin | Updated: January 26, 2016 01:38 IST2016-01-26T01:38:11+5:302016-01-26T01:38:11+5:30
‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने सोशल मीडियावरून सुरू ठेवलेल्या प्रचाराकडे पिंपरी-चिंचवडमधील तरुणवर्ग आकर्षित होऊ लागल्याचे एका संघटनेच्या सर्वेक्षणातून नोव्हेंबरमध्ये निदर्शनास आले

प्रजासत्ताक दिनानिमित्त दक्षतेच्या उपाययोजना
पिंपरी : ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने सोशल मीडियावरून सुरू ठेवलेल्या प्रचाराकडे पिंपरी-चिंचवडमधील तरुणवर्ग आकर्षित होऊ लागल्याचे एका संघटनेच्या सर्वेक्षणातून नोव्हेंबरमध्ये निदर्शनास आले. त्यातच मुंबईत स्फोट घडवून आणण्याचा इशारा देणाऱ्या एका आरोपीला पुण्यात पकडले. त्यामुळे दहशतवादी कारवायांच्या शक्यतेने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पोलीस यंत्रणा सजग झाली असून, दक्षतेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
इस्लामिक स्टेट असा उद्देश बाळगून कार्यरत असलेल्या इसिस (इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया) या दहशतवादी संघटनेने टिष्ट्वटर, यू ट्यूब, फेसबुक, गुगल अशा सुमारे ९० हजारांहून अधिक सोशल साइट अकांउटच्या माध्यमातून प्रचार सुरू ठेवला आहे. इसिसने आपले जाळे पसरविण्यास सुरुवात केली असताना, कल्याणमधील चार तरुण इसिसमध्ये सहभागी झाल्याचे यापूर्वी उघडकीस आले आहे. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने भारताला इसिसपासून धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या ‘सिमी’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित काही युवकांनी शहरात आश्रय घेतल्याचे यापूर्वी उघडकीस आले होते.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, जंगलीमहाराज रस्ता बॉम्बस्फोट या घटना पुण्यात घडल्या आहेत. त्यामुळे पुण्यात दहशतवादी हल्ले होत असल्याचा प्रत्यय नागरिकांना आला आहे. त्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली आहे.
स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्याच्या ताज्या घटनांमुळे पोलीस यंत्रणा अधिक सजग झाली आहे.
(प्रतिनिधी)