महापौर नितीन काळजे कुणबीच - जात पडताळणी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 15:55 IST2017-08-14T15:55:41+5:302017-08-14T15:55:41+5:30
पुणे जिल्हा जात पडताळणी समितीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र वैध ठरले आहे. यामुळे महापौरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महापौर नितीन काळजे कुणबीच - जात पडताळणी समिती
पिंपरी चिंचवड, दि. 14 - पुणे जिल्हा जात पडताळणी समितीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र वैध ठरले आहे. यामुळे महापौरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मोशी चऱ्होली प्रभाग तीन मधून नितीन काळजे यांनी ओबीसी प्रवर्गातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. मात्र, महापौर काळजे यांनी सादर केलेला कुणबी जातीचा दाखला बनावट असल्याचा आक्षेप त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व माजी नगरसेवक घन:श्याम खेडकर यांनी घेतला होता. यासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती.
त्यानंतर महापौर काळजे यांच्या जात प्रमाणपत्राची चार महिन्यांत फेरपडताळणी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागांतर्गत असलेल्या विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिली होता. त्यासाठी न्यायालयाने समितीला चार महिन्यांची मुदत दिली होती.
जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत दक्षता समितीसमोर सुनावणी झाली. महापौर काळजे यांनी कुणबी जातीचे असल्याचे पुरावे जोडले होते. त्यानंतर दक्षता समितीने त्यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. याबाबत वकील एस. आव्हाड यांनी काम पाहिले. पत्रकार परिषदेश पक्षनेते एकनाथ पवार उपस्थित होते.
महापौर नितीन काळजे म्हणाले, आपण कुणबीच आहे. प्रतिस्पर्ध्यांनी विनाकारण त्रास देण्यासाठी प्रमाणपत्राला आक्षेप घेतला होता. अखेर सत्याचा विजय झाला आहे.