दौंड : म्हशी आणि गाईच्या दुधात वाढ व्हावी म्हणून इंजेक्शन वेळोवेळी गाई आणि म्हशींना देऊन मानवी आरोग्यास अपायकारक होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी दिनेश हिरणावळे (रा. हनुमान मंदिर, दौंड) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम यांनी दिली. ही कारवाई अन्न व प्रशासन विभागाने केली.
या प्रकरणी अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी सुदाम सावंत यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे दौंड शहरात खळबळ उडाली आहे. भेसळीच्या अशा घटनाना आळा बसावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.या गंभीर घटनेसंदर्भात अन्न व प्रशासन विभागाला गुप्त माहितीगारांकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषधे प्रशासन विभागाच्यावतीने पानसरे वस्ती येथील म्हशींच्या गोठ्यावर छापा टाकला. औषध निरीक्षक सचिन बुगड, अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती बारवकर तसेच दौंड पोलिस पथकाने गोठ्यावर छापा टाकला. यावेळी गोठ्यात चाळीस म्हशी होत्या. तसेच १०० मि.लि. मापाच्या तीन लेबल नसलेल्या वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या सापडल्या. ट्रान्सपरंट लिक्विड असलेली औषधाची बाटली व चार वापरलेले प्लास्टिकचे सिरींज तसेच एक निडल सापडली.