पदाधिकाऱ्यांसाठी आलिशान गाड्या
By Admin | Updated: October 28, 2015 01:25 IST2015-10-28T01:25:19+5:302015-10-28T01:25:19+5:30
उत्पन्नाचे स्रोत कमी होत असल्याने खर्च करताना योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, असे म्हटले जात असले, तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने महापालिकेकडून पैशांची उधळपट्टी सुरूच आहे

पदाधिकाऱ्यांसाठी आलिशान गाड्या
पिंपरी : उत्पन्नाचे स्रोत कमी होत असल्याने खर्च करताना योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, असे म्हटले जात असले, तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने महापालिकेकडून पैशांची उधळपट्टी सुरूच आहे. जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासाठी प्रत्येकी आठ लाख रुपये किमतीच्या दोन मोटारी खरेदी करण्यास मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत ऐनवेळच्या प्रस्तावाद्वारे मान्यता देण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी अतुल शितोळे होते. मागील महिन्यात जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मोरेश्वर भोंडवे यांची निवड करण्यात आली. या समितीचे कामकाज सुरू झाले असून, अध्यक्षांनी वाहन आणि कार्यालयाची मागणी केली आहे. त्यानुसार अध्यक्षांसाठी एक वाहन खरेदी केले जाणार आहे. तसेच पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडील सध्याच्या वाहनास अकरा वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने ते वारंवार नादुरुस्त होते. यामुळे कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याने सांगत त्यांच्यासाठीही एक वाहन खरेदी करण्यात येणार आहे. एका वाहनाची किंमत आठ लाख रुपये असून, दोन वाहने खरेदी करण्यासाठी १६ लाखांच्या खर्चास मंगळवारी ऐन वेळच्या विषयाद्वारे मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)