पिंपरी : लोन इएमआय विषयीची शंका दूर करण्याच्या बहाण्याने स्क्रीन शेअरिंग ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. या ॲपद्वारे परस्पर दोन लाखाचे कर्ज काढून ते आपल्या बँक खात्यात वळते करत ३४ वर्षीय व्यक्तीची फसवणूक केली. ही घटना २७ फेब्रुवारीला लांडेवाडी, भोसरी येथे घडली. या प्रकरणी कृष्णा बालाजी रोडगे (वय ३४, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.२०) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने फोन करत तो आयसीआयसीआय बँक मॅनेजर असल्याचे भासवून लोन ईएमआय बाबतची शंका दूर करण्यासाठी विश्वास संपादन केला. तसेच फिर्यादी यांना त्याने एनी डेस्क नावाचे स्क्रिन शेअरिंग ॲप्लीकेशन डाउनलोड करण्यास भाग पाडले. आणि त्याद्वारे फिर्यादी यांचे बँक खात्याचा इंटरनेट बँंकिंग लॉगईन आयडी व पासवर्ड मिळवून फिर्यादी यांच्या बँक खात्यातून २४ हजार रुपये काढून घेतले. तसेच फिर्यादी यांच्या नावे आयसीआयसी बँकेने दोन लाख रुपये रक्कमेचे लोन परस्पर मंजूर करुन घेवून ते पैसे देखील फिर्यादीच्या परवानगीशिवाय परस्पर वळते करून फिर्यादी यांची एकूण दोन लाख २४ हजार रुपयांची फसवणूक केली.