कुष्ठरोगी बनले स्वावलंबी
By Admin | Updated: November 10, 2015 01:45 IST2015-11-10T01:45:09+5:302015-11-10T01:45:09+5:30
पूर्वी कुष्ठरोग असलेले कुटुंब वाळीत टाकण्याचा प्रकार होता. त्यामुळे दापोडी येथील कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत मद्यनिर्मितीचा व्यवसाय चालायचा.

कुष्ठरोगी बनले स्वावलंबी
सुवर्णा नवले-गवारे, पिंपरी
पूर्वी कुष्ठरोग असलेले कुटुंब वाळीत टाकण्याचा प्रकार होता. त्यामुळे दापोडी येथील कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत मद्यनिर्मितीचा व्यवसाय चालायचा. परंतु, आनंदवन संस्थेने या कुष्ठरोगींना स्वावलंबी होण्यासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले. एकेकाळी मद्यविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या कुष्ठरोगींनी आता पिठाची गिरणी व अन्य लघुउद्योग सुरू केले आहेत. मद्यविक्रीचा व्यवसाय बंद केल्यामुळे त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळू लागली आहे.
दापोडीत सहा वर्षांपूर्वी कुष्ठरुग्णांच्या वसाहतीत मद्य तयार करून विक्रीचा व्यवसाय जोमात होता. पैसे मिळत असले, तरी समाजाकडून वेगळ्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जात होते. आनंदवन संस्थेत येण्यासाठी अनेक नागरिक नकार देत होते. त्यामुळे आनंदवन संस्थेचे कार्यकर्ते अस्वस्थ होते. तत्कालीन पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी पुढाकार घेतला. संस्थेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून मद्यनिर्मिती व विक्री बंद करण्यासाठी त्यांचे परिवर्तन केले. मद्यविक्रीऐवजी पिठाची गिरणी आणि रेशन दुकान परवाना मिळण्यासाठी मदत केली.
कुष्ठरुग्णाच्या कुटुंबातील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांचे १० बचत गट स्थापन केले. स्वावलंबी जीवन जगण्यासाठी बचत गटांतील महिलांनी स्वयंरोजगार व एकत्रित छोटे उद्योग करण्याचा निर्धार केला. चिकाटीने या महिला एकत्रितपणे व्यवसाय करीत आहेत. नागरिक दळणासाठी येऊन पूर्वीचा व्यवसाय बंद केल्याबद्दल कौतुक करतात.