कामशेत बाजारपेठ ठप्प
By Admin | Updated: November 14, 2016 02:50 IST2016-11-14T02:50:46+5:302016-11-14T02:50:46+5:30
कामशेत बाजारपेठ ठप्प

कामशेत बाजारपेठ ठप्प
कामशेत : एटीएममध्ये पैसे नसल्याने आणि बँकांमध्येही रांगेत थांबून अपुरे पैसे मिळत असल्याने कामशेत शहरातील सर्व बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले आहेत. महत्त्वाच्या बँकांबाहेर नागरिकांच्या लाबंच लाब रांगा रविवारी लागल्या होत्या.
शनिवारनंतर रविवारी सर्वच बँका सुरू होत्या. ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा, तसेच रक्कम खात्यात जमा करण्यासाठी नागरिकांनी बँकांबाहेर सकाळपासूनच लांबचलांब रांगा लावून मोठी गर्दी केली होती. बँकांच्या परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते. बेशिस्त वाहने उभी केल्याने वाहतूककोंडीत भर पडत होती. त्यात कामगार, नोकरदार, व्यावसायिक, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची संख्या मोठी होती. काही ठिकाणी कुटुंबातील सर्वच सदस्य बँकांच्या रांगेमध्ये उभे होते. सर्व एटीएम बंदच होती. एचडीएफसी बँकेसमोर नोटा बदली करण्यासाठी रांगेत थांबलेल्या नागरिक व खातेदारांना पाणी, चहा तसेच चॉकलेटचे वाटप बँकेतील व्यवस्थापक व कर्मचारी करीत होते.
चार-पाच तास लांबलचक रांगांमध्ये उभे राहूनही एक दोन हजार रुपयांवर समाधान मानावे लागले. काही बँकांमध्ये पैसेच नसल्याचे उत्तर मिळत होते. अनेक अत्यावश्यक ठिकाणी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नव्हत्या.
रुग्णालय, औषध दुकान, पेट्रोल पंप, वीज बिल भरणाकेंद्र, पतसंस्था, हॉटेल, भाजी मंडई आदी ठिकाणी पाचशे व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने अनेकांची पंचायत झाली. बाजारपेठ गेली चार दिवसांपासून संथ गतीने चालू असून, रविवारी बाजारपेठेत किरकोळ स्वरूपाचे व्यवहार सुरू होते. शनिवारी काही बँकांमध्ये ओळखीच्या तसेच मोठ्या खातेदारांनाच नोटा बदलून व खात्यात पैसे भरण्यासाठी बँक कर्मचारी मदत करत असल्याच्या आणि प्रमाणापेक्षा जास्त पैसे पुरवत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. व्यापारी नोटा बदलण्यास येत नाहीत. तसेच त्यांचे व बँकांचे संबंध चांगले असल्याने मोठ्या खातेदारांना कर्मचारी घरपोच सेवा देत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत
होत्या. (वार्ताहर)