पिंपरी : महापालिकेच्या वतीने नगरसेवकांसाठी राबविण्यात येणारी आरोग्य विमा योजना शिवसेनेच्या नऊ आणि भाजपाच्या दोन सदस्यांनी नाकारली आहे. महापालिकेतील स्थायी समिती सभेत नगरसेवकांना आरोग्य विमा योजना राबविण्याचा विषय होता. त्यासाठी येणाºया १८ लाख रुपये खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली.महापालिकेत नगरसेवकांची संख्या १२८ आहे. पाच स्वीकृत सदस्य असे एकूण १३३ नगरसेवक आहेत. नगरसेवक व कुटुंबीयांसाठी महापालिकेतर्फे आरोग्य विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापैकी सात नगरसेवकांनी यापूर्वीच विम्याची सवलत नाकारली आहे. पालिकेचा खर्च वाचविण्याचे धोरण काही नगरसेवकांनी अवलंबिले आहे. शिवसेनेच्या ९ नगरसेवकांनी विमा नाकारल्याचे सदस्य अमित गावडे यांनी सांगितले, तर भाजपाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, सदस्या उषा मुंढे यांनीही विमा नाकारला आहे.>नगरसेवकासह कुटुंबीयांसाठी महापालिकेतर्फे आरोग्य विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ११० अधिक पाच स्वीकृत अशा ११५ नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा योजना लागू करण्यात येणार आहे. हा विमा नगरसेवक दाम्पत्य आणि त्यांच्या २१ वर्षांपर्यंतच्या दोन अपत्यांसाठी लागू असेल. या विमा योजनेसाठी महापालिकेतर्फे विमा कंपन्यांकडून निविदा मागविल्या. निविदा दर १९ लाख ६६ हजार रुपये निश्चित करण्यात आला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने दोनदा मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर मार्श इंडिया इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड या एकाच कंपनीची निविदा प्राप्त झाली. त्यांनी निविदा दरापेक्षा नऊ टक्के कमी म्हणजेच १७ लाख ८९ हजार रुपये दर सादर केला.
विमा ११ नगरसेवकांनी नाकारला, असा आहे आरोग्य विमा योजनेचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:31 IST