इंद्रायणीतील जलपर्णीचा त्रास
By Admin | Updated: December 24, 2016 00:33 IST2016-12-24T00:33:10+5:302016-12-24T00:33:10+5:30
काही महिन्यांपूर्वीच पावसामुळे नदीच्या पुरात जलपर्णी वाहून गेली होती.यामुळे इंद्रायणी नदी मोकळा श्वास घेत संथ वाहत होती

इंद्रायणीतील जलपर्णीचा त्रास
मोशी : काही महिन्यांपूर्वीच पावसामुळे नदीच्या पुरात जलपर्णी वाहून गेली होती.यामुळे इंद्रायणी नदी मोकळा श्वास घेत संथ वाहत होती.मात्र, रसायनमिश्रित पाण्यात पुन्हा जलपर्णीचा विळखा वाढताना दिसून येत आहे. सध्या नदीपात्रातील जलपर्णी पूर्ण अवस्थेत वाढलेली नसून, ती दिवसागणिक पसरत असल्याचे दिसून येत आहे. पालिकेनेच याबाबत तत्काळ पावले उचलल्यास हा वाढता विळखा थांबवून वाढ झालेली जलपर्णी काढून टाकल्यास जलपर्णीच्या वाढीवर काही प्रमाणात अंश ठेवता येणार आहे. नदीच्या पाण्यात चिखली येथील औद्योगिक कंपन्यांचे मैलामिश्रित व रसायनयुक्त पाणी मिसळत असल्याने नदीतील जलपर्णी वाढीला खतपाणी मिळत आहे. त्यात या जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह वाहता नसल्याने एकाच जागी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत आहे. याचा त्रास नदीच्या काठावरील चिखली, मोशी, डुडुळगाव, आळंदी या गावांना होत आहे. मोशी येथील गायकवाड वस्ती,आळंदी येथील तापकीरनगर परिसरात हा त्रास जास्त प्रमाणात जाणवत असून, सायंकाळी सातच्या पुढे डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, त्यात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. जलपर्णीचा वाढता विळखा स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, त्यातून उत्पत्ती होणाऱ्या डासांचा व चिलटांचा उपद्रव नदीकाठच्या रहिवाशांना सहन करावा लागत आहे. परिसरातील वस्त्यांमधील अनेक मुलांना कांजिण्या आल्या असून, कावीळ,उलट्या, जुलाब या आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होत आहे. एकंदरीतच इंद्रायणीतील जलपर्णी आसपासच्या गावांना त्रासदायक ठरत असून, इंद्रायणी शुद्धीकरणाचा प्रस्ताव मंजुरीचा प्रतीक्षेत असला, तरी त्याबाबत योग्य तो पाठपुरावा लवकरात लवकर व्हावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.(वार्ताहर)