वाढीव खर्चाचा लावलाय सपाटा
By Admin | Updated: June 23, 2016 02:05 IST2016-06-23T02:05:25+5:302016-06-23T02:05:25+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीकडून ठेकेदारांना वाढीव खर्च देण्याचा सपाटा सुरूच आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत वेगवेगळ्या पाच कामांसाठी ठेकेदराला

वाढीव खर्चाचा लावलाय सपाटा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीकडून ठेकेदारांना वाढीव खर्च देण्याचा सपाटा सुरूच आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत वेगवेगळ्या पाच कामांसाठी ठेकेदराला ६६ लाख रुपयांचा वाढीव खर्च देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
डेअरी फार्म रोड सी ब्लॉक व इतर परिसरातील जलनिस्सारण नलिकांची सुधारणा करण्यासाठी महापालिकेकडून ३० लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. एका ठेकेदाराला २७.७७ टक्के कमी दराने म्हणजे २२ लाख ७५ हजार २४५ रुपयांना काम देण्यात आले. आता या कामासाठी स्थायीने वाढीव १३ लाख १४ रुपयांच्या वाढीव खर्चास मंजुरी दिली आहे.
तसेच दापोडी पंपिंग स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुख्य जलनिस्सारण नलिकांची सुधारणा करण्याच्या कामासाठी ५२ लाख ४९ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. निविदा प्रक्रिया राबविली असता. एका ठेकेदाराला हे काम ३३.१ टक्के कमी दराने म्हणजेच ३६ लाख ९२ हजार ७५२ रुपयांना देण्यात आले. आता या कामासाठी स्थायी समितीने ९ लाख ९६ हजार ५४८ रुपयांच्या वाढीव खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या कामाचा खर्च आता ४६ लाख ८९ हजार ३०० रुपयांवर गेला आहे.
रहाटणीतील शिवराजनगर व नखाते वस्तीमधील जलनिस्सारणविषयक कामे करणे यासह रहाटणी रस्ता ते तांबे शाळामार्गे दत्तनगर या भागात मलवाहिनी टाकण्यात आली असून, पुढे गजानननगरपर्यंत टाकण्यात येणार आहे. या कामासाठी २१ लाख ५९ हजार ६९६ रुपये मंजूर केले होते. आता पुन्हा या कामासाठी स्थायीने १४ लाख ३ हजार ८०९ रुपयांच्या वाढीव खर्चास मंजुरी दिली आहे.
रहाटणी व पिंपळे निलखमध्ये जलनिस्सारणविषयक देखभाल दुरुस्तीचे काम ठेकेदाराला १० लाख ९४ हजार ८२६ रुपयांना देण्यात आले होते. स्थायी समितीने १८ लाख २४ हजार ७७४ रुपयांच्या वाढीव खर्चाला मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)