थंडीमुळे सुका मेव्याच्या मागणीत झाली वाढ
By Admin | Updated: November 16, 2016 02:25 IST2016-11-16T02:25:06+5:302016-11-16T02:25:06+5:30
सध्या अनेक नागरिक काजू, बदाम, खारीक, मणुका आदी सुकामेवा खरेदी करण्यासाठी दुकानावर गर्दी करताना दिसून येत आहेत

थंडीमुळे सुका मेव्याच्या मागणीत झाली वाढ
रहाटणी : सध्या अनेक नागरिक काजू, बदाम, खारीक, मणुका आदी सुकामेवा खरेदी करण्यासाठी दुकानावर गर्दी करताना दिसून येत आहेत, तर इतर ऋतूंच्या तुलनेत सध्या मागणी वाढल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली. सुका मेव्याच्या किमतीही किलोमागे १00 ते ५00 रुपयांनी वाढल्या आहेत.
हिवाळ्यात थंडीमुळे भूक लागते. पचनक्षमताही वाढते. म्हणून दैनंदिन आहारात स्निग्ध पदार्थ व प्रथिनांचे प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे मत आहारतज्ज्ञ व्यक्त करतात. ऋतूनुसार आहारातही बदल करावा लागतो.
स्थानिक बाजारपेठेत सुकामेव्याची दुकाने थाटलेली दिसत आहेत. यात गूळ, शेंगदाणे, खोबरे, तीळ हे पदार्थ विक्रीला आहेत. या वस्तूंच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अंजीर, बदाम, अक्रोड, पिस्ता, पेंडखजूर यापासून तयार लाडूंची मागणीही वाढल्याचे विक्रेते सांगतात. बाजारपेठेत सुका मेव्यापासून तयार केलेले लाडू विक्रीला उपलब्ध आहेत . पूर्वी असे लाडू घराघरांत आवर्जून केले जात होते. मात्र धावपळीच्या जमान्यात असे पदार्थ बनविण्यासाठी कोणालाही वेळ नसल्याने तयार केलेले असे पदार्थ विकत घेण्यास नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. पूर्वी हिवाळा म्हटला की घरातील तरुण मुले व्यायाम करण्यासाठी अगदी पहाटे आखाड्यात जात असत. घरी परतल्यानंतर सुकामेवा खुराक म्हणून खात असत. मात्र सध्या याउलट झाले आहे . तरुण वेळ मिळेल तेव्हा जीममध्ये जाऊन व्यायाम करीत असल्याने खुराकाचा प्रश्नच निकाली निघाला आहे. अनेक नागरिक हिवाळ्यात सुकामेव्याला महत्त्व देत आहेत. (वार्ताहर)