ऐतिहासिक ठेव्याकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: July 23, 2015 04:44 IST2015-07-23T04:44:57+5:302015-07-23T04:44:57+5:30
अगदी नावासमोरील पदवीला साजेसा सरसेनापती उमाबाई व खंडेराव दाभाडे या वीर दाम्पत्याच्या पराक्रमाची साक्ष देणारा तळेगावातील

ऐतिहासिक ठेव्याकडे दुर्लक्ष
तळेगाव स्टेशन : अगदी नावासमोरील पदवीला साजेसा सरसेनापती उमाबाई व खंडेराव दाभाडे या वीर दाम्पत्याच्या पराक्रमाची साक्ष देणारा तळेगावातील ऐतिहासिक ठेवा तळेगावकर व इतिहासप्रेमींच्या दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेला मूर्त रूप देण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या आणि लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही वीर लढाऊ एकमेव दाम्पत्य म्हणून नोंद झालेल्या श्रीमंत सरदार सरसेनापती खंडेराव आणि सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा इतिहास सर्वश्रुत आहे. मात्र, त्यांच्या पराक्रमी कारकिर्दीची साक्ष देणारा तळेगावातील दाभाडे वाडा, इंदोरीतील किल्ला व दाभाडे दाम्पत्याच्या समाधी स्थानिक प्रशासनाबरोबरच तळेगावकरांकडून दुर्लक्षितच राहिल्या आहेत. या वास्तू देखभालीअभावी झालेल्या दुर्दशेमुळे जीर्णावस्थेकडे जात आहेत.
सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने बांधलेली बनेश्वर मंदिराशेजारची समाधी ही उत्कृष्ट शिल्पाकृतीचा नमुना आहे. अशा प्रकारची ही एकमेव समाधी म्हणावी लागेल. समाधीच्या चौथऱ्यावर चोहोबाजूंनी रामायण व महाभारत शिल्परूपात कोरलेले आहे. अद्वितीय व एकमेव असे हे शिल्प असून, इतरही अनेक वैशिष्ट्ये या समाधीच्या बांधकामात आढळतात. पार्थपुत्र अभिमन्यूने भेदलेल्या चक्रव्यूहाचे, भारतात एकमेव असे शिल्प याच समाधीवर कोरलेले आहे. मराठ्यांची राजधानी शिवतीर्थ रायगडाच्या राजसदरेवरील मुख्य प्रवेशद्वारावर कोरलेल्या चार पायांत, तोंडात आणि शेपटीत सहा (हत्तीरूपी) शाह्या जखडून ठेवणाऱ्या सिंहाचे साधर्म्य असलेले शिल्पदेखील कोरलेले आहे. मात्र, ती वास्तू जतन करण्यासाठी पाठपुरावा करायलाही कुणाला वेळ मिळालेला दिसत नाही.
बनेश्वर मंदिराच्या बाहेरील प्रवेशद्वारासमोर चिंचेच्या झाडाखाली सरसेनापती उमाबाई यांच्या समाधीस्थळाचीही दुरवस्था असून बांधकाम व कठडा भग्नावस्थेच्या मार्गावर आहे. समाधीच्या भोवती कचरा आणि घाणीचे साम्राज्य आहे. समाधीच्या आजूबाजूला कोरीव काम केलेले शिल्पाकृती चार-पाच छोटे दगडी खांब विखुरलेले दिसतात.
दाभाडेंचा तळेगावातील व् वाडा पूर्णपणे कोसळला असून, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बुरूज, तटबंदी, भिंती पूर्णपणे ढासळल्या आहेत. सगळीकडे झाडेझुडपे, कचरा, घाणीचे साम्राज्य आहे. किल्ल्याचा इतरांकडून वाममार्गासाठी वापर होत आहे. यापूर्वीच डागडुजी केली असती, तरी वाडा बऱ्यापैकी वाचला असता. नगर परिषदेने वाड्याला अगदी खेटूनच सार्वजनिक शौचालय बांधले आहे. वाड्यामध्ये संग्रहालयात ठेवण्यायोग्य अशा पुरातनकालीन वस्तू, जाते, तुळया, स्तंभ पडून आहेत. बरेचसे गायबही झाले आहेत. महाराष्ट्र सांस्कृतिक आणि पुरातत्त्व विभाग, े नगर परिषद याबाबत उदासीन आहे.
इंदोरीतील भुईकोट किल्ला वेड्याबाभळ व झुडपांनी आक्रमित केला असून, प्रवेशद्वार सोडले, तर तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या स्थितीत आहेत. सह्याद्री प्रतिष्ठान, गडवाटच्या दुर्गप्रेमींनी बऱ्याच वेळा मोहीम राबवून किल्ल्याची स्वच्छता केली. परंतु, या कामी स्थानिकांचे सहकार्य लाभत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
तळेगावातील बनेश्वर मंदिरासमोरील पुरातन बारवदेखील दुर्लक्षितच आहे. बारवमध्ये पाण्याचा जिवंत स्रोत असून, वेली व झुडपांनी व्यापलेल्या पाणी अस्वच्छ बनले आहे. बारवमध्ये पंप टाकून पाणी वापरत असले, तरी स्वच्छतेची तसदी घेताना दिसत नाही. (वार्ताहर)