बनावट मद्यनिर्मिती करणारा महाठग निसटतो कसा?
By Admin | Updated: September 25, 2015 01:04 IST2015-09-25T01:04:15+5:302015-09-25T01:04:15+5:30
बनावट मद्यनिर्मिती करणारे पिंपरी-चिंचवडमधील रॅकेट शोधण्यास येथील उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी कमी पडले.

बनावट मद्यनिर्मिती करणारा महाठग निसटतो कसा?
पिंपरी : बनावट मद्यनिर्मिती करणारे पिंपरी-चिंचवडमधील रॅकेट शोधण्यास येथील उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी कमी पडले. उत्पादनशुल्क विभागाच्या मुंबईतील पथकाने वडमुखवाडीतील बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. २८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून सात
जणांना अटक केली. परंतु नेहमीप्रमाणे रॅकेटचा सूत्रधार
किशोर गोसावी निसटलाच. हा प्रकार ‘लोकमत’ने यापूर्वीच चव्हाट्यावर आणला असून, बनावट दारू निर्मितीचे रॅकेट कार्यरत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने जुलैमध्ये दिले होते.
‘पिंपरीत दारूचा महापूर’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने १८ व १९ जुलैला बनावट दारूनिर्मिती करणारे त्रिकुट पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या त्रिकुटातील प्रमुख दोन आरोपी हाती लागले असून, त्रिकुटात सक्रीय असलेला पिंपरी कॅम्पातील एक व्यापारी मात्र अजूनही गळाला लागत नाही. पिंपरीतील पोलीस आणि उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी बनावट दारूनिर्मिती करणाऱ्यांकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करीत असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर पिंपरीतील उत्पादनशुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने त्रिकुटाबद्दल माहिती देता का, अशी विचारणा लोकमत प्रतिनिधीला केली होती. त्या त्रिकुटातील एक किशोर गोसावी, दुसरा विनोद कलोसिया असल्याचे मुंबईच्या पथकाने केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. तर पिंपरी कॅम्पात बनावट दारूविक्रीत आघाडीवर असलेला व्यापारी त्रिकुटातील एक असून, त्याच्यापर्यंत तरी पोहोचण्याची कार्यतत्परता पिंपरीतील उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी दाखवतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांचा दावा खोटा
४पिंपरी-चिंचवडमध्ये बनावट दारू तयार होत नाही, हा येथील अधिकाऱ्यांचा दावा खोटा ठरला आहे. उत्पादनशुल्क विभाग आणि पोलिसांचे छापे ज्या वेळी झाले, त्या त्या वेळी बनावट दारू तयार करणारे रॅकेट हाती लागले नाही. इतरांना अडकवून ते निसटले. एका माजी नगरसेवकाने पाच वर्षांपूर्वी या त्रिकुटाला भाड्याने जागा दिली होती. पोलिसांनी छापा टाकला असता, प्रमुख सूत्रधार सहीसलामत बाहेर पडले. मात्र जागा भाड्याने देणाऱ्यांच्या मागे ससेमिरा लागला. त्यांच्यावर खटला दाखल झाला. ते न्यायालयाच्या फेऱ्या मारतच आहेत.
पळवाट शोधण्यासाठी सूत्रधारांना अभय
४छापा टाकला, कारवाई झाली, तर तोडगा शोधेपर्यंत आरोपी गायब करणे, कालांतराने आरोपी स्वत:हून हजर होईल, अशी व्यवस्था करणे असे प्रकार बनावट दारूनिर्मिती अथवा बेकायदा दारूसाठा करणाऱ्यांवरील कारवाईच्या वेळी घडून येत आहेत. गतवर्षी ७ जानेवारीला उत्पादनशुल्क विभागाच्या पथकाने वाल्हेकरवाडीत हॉटेलवर छापा टाकला. बेकायदा मद्यसाठा ठेवल्याप्रकरणी ताब्यात घेतलेला आरोपी नागेश अचानक गायब झाला. तीन दिवसांनी १० जानेवारीला तो स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला. निराधारनगरला स्पिरिटच्या साठ्याला आग लागली. या आगीत उत्पादनशुल्क विभागाचे दोन कर्मचारी दगावले. स्पिरिटचा साठा पेटण्यास कारणीभूत ठरणारी ती आगकाडी कोणी टाकली, असा प्रश्न उपस्थित झाला. त्या वेळी उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी पेचात पडले. सरतेशेवटी काडी टाकणारा नागेशच होता, असा शोध लावून त्यातून बाहेर पडण्याची पळवाट त्यांनी शोधली. या घटनेत ताब्यात घेतलेला नागेश गायब होतो. नंतर स्वत:च पोलिसांच्या हवाली होतो. असाच प्रकार किशोर गोसावीच्या बाबतीतही घडल्यास नवल ते काय?
मुख्य सूत्रधार सहीसलामत
४पिंपरीतील बनावट दारूनिर्मिती करणाऱ्यांचे मुंबई, औरंगाबाद, बीड, अहमदनगर आदी ठिकाणी नेटवर्क पसरलेले आहे. बनावट दारूनिर्मिती करणारे पोलिसांच्या हाती लागले, तरी गुन्हा दुसऱ्याच कोणावर तरी दाखल होतो. प्रमुख सूत्रधाराला त्यातून सहीसलामत वगळले जाते. बनावट मद्यनिर्मिती व्यवसायात वर्चस्व प्रस्थापित केलेल्यांनी अशा प्रकारचे गुन्हे अंगावर घेणारेसुद्धा तयार केले आहेत. प्रमुख आरोपी एक आणि कारवाई दुसऱ्यावरच अशा पद्धतीची कार्यप्रणाली अवलंबली जात असल्याने प्रमुख सूत्रधार हाती लागत नाहीत. पकडले गेले, तरी ते पुन्हा सक्रीय होत असल्याचे निदर्शनास आले आहे.