आरोग्य यंत्रणाच आजारी

By Admin | Updated: July 27, 2015 03:51 IST2015-07-27T03:51:58+5:302015-07-27T03:51:58+5:30

तळेगावची दाभाडे येथील पुणे जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी

The health system is sick | आरोग्य यंत्रणाच आजारी

आरोग्य यंत्रणाच आजारी

तळेगाव स्टेशन : तळेगावची दाभाडे येथील पुणे जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यातील समन्वय आणि नियोजनाचा अभावामुळे शहरातील कचरा नियोजन असो, की आरोग्य विभागाच्या रोगप्रतिबंधक उपाययोजना सर्वच स्तरांवर यंत्रणा कोलमडली आहे. त्यामुळे तळेगावकरांचे आरोग्य रामभरोसे आहे.
जिजामाता चौकाजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरी व ग्रामीण अशा दोन्ही यंत्रणा कार्यान्वित आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण भागातील रुग्णांसाठी पुरेसे कर्मचारी व मनुष्यबळ उपलब्ध असले, तरी नागरी रुग्णांसाठी केवळ एकच परिचारिका असल्याने त्याचा ताण इतर कर्मचाऱ्यांवर येतो आहे. शहरी विभागासाठी किमान २ पर्यवेक्षक आणि ३ ते ४ आरोग्यसेवकांची गरज असताना एकाच कर्मचाऱ्यावर भागवले जात आहे. रोगराई व साथीच्या काळात नागरी विभागात सर्वेक्षणासाठी कर्मचारीच नाहीत. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नगर परिषदेला १ आरोग्य अधिकारी, ६ परिचारिका, ६ आरोग्यसेवक, १ औषधनिर्माता, १ लिपिकासह आवश्यक पदांसाठी मंजुरी मिळाली आहे. मात्र, कित्येक वर्षांपासून ‘नोकरभरतीची प्रक्रिया सुरू आहे’ असेच ऐकायला मिळते.
वैद्यकीय अधिकारी निवृत्त झाल्याने नवीन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे हे येथे रुजू झाले असले, तरी त्यांच्याकडे तळेगाव व कामशेत या दोन्ही ठिकाणची जबाबदारी असल्याने त्यांच्यावर नियोजनाचा ताण वाढला आहे. आरोग्य केंद्रात डासांचा उपद्रव व कमालीची अस्वच्छता आहे. निरोगी माणूसदेखील येथे आल्यावर आजारी पडेल अशी परिस्थिती आहे. आवारातील गवत वाढले असून, मागील बाजूस नवीन शवविच्छेदनगृहाच्या कडेला राडारोडा, मोडकी झाडे, तुटलेले सिमेंटचे खांब विखुरलेले दिसतात.
रुग्णालयाच्या पर्यवेक्षकास विचारले असता, शवविच्छेदन खोलीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सांगूनही राडारोडा उचलला नसल्याचे सांगितले. विच्छेदनगृहाची जुनी खोली कधी कोसळेल सांगता येत नाही. स्वच्छतागृहात अंधार असून, पाय ठेवायलाही कोरडी व स्वच्छ जागा नाही. लसीकरण गृह आणि आॅपरेशन थिएटरसमोरील पाण्याच्या टाक्याशेजारी घाणीचे साम्राज्य असून, त्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होऊन बरे होण्याऐवजी रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
नगर परिषद स्वच्छता विभागाचा कचरा व्यवस्थापन ठेकेदार व पालिकेचे सफाई कामगार यांवर कसलाही वचक राहिला नसून, तळेगावात चोहीकडे कचराकुंड्या ओसंडून वाहत असून, दुर्गंधी पसरली आहे.घंटागाडीचा कचरा गोळा करण्याचा मार्ग फक्त कागदावरच असून, जोशीवाडीसारख्या ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी जात नसल्याची तक्रार आहे.अंबिका पार्कजवळील नियोजित रेल्वे फाटकाशेजारील झुडपांत नागरी वस्तीशेजारी नगर परिषदेची ड्रेनेजची गाडी घाण ओतून देते. जनरल हॉस्पिटलच्या कंपाउंडशेजारी शर्मा बेकरीसमोर चाकण रस्त्यावर व्यावसायिक उघड्यावर कचरा फेकत आहे. गावातील मारुती मंदिरामागे तसेच स्टेशनच्या सेवाधाम हॉस्पिटल,शहा गँस पंप ते जोशीवाडी रिंगरोडवरही कचराकुंड्या तुडुंब भरल्याने मोकाट कुत्री रस्त्यावरच कचरा पांगवत आहेत. कुत्र्यांचा उच्छाद थांबविण्यासाठी आवश्यक साधनसामग्री व प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने आरोग्य विभागाला कंत्राट नूतनीकरणाची हतबलतेने वाट पाहावी लागते. (वार्ताहर)

Web Title: The health system is sick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.