हॉकर्स झोन नसल्याने पथारीवाल्यांचा रस्त्यावर ठिय्या
By Admin | Updated: June 23, 2016 02:03 IST2016-06-23T02:03:12+5:302016-06-23T02:03:12+5:30
भोसरी विधानसभा मतदारसंघातील अतिशय महत्त्वाचा म्हणून भोसरी गावठाण प्रभागाचा नावलौकिक आहे. जुने संपूर्ण भोसरी गाव या प्रभागात येत आहे

हॉकर्स झोन नसल्याने पथारीवाल्यांचा रस्त्यावर ठिय्या
भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील अतिशय महत्त्वाचा म्हणून भोसरी गावठाण प्रभागाचा नावलौकिक आहे. जुने संपूर्ण भोसरी गाव या प्रभागात येत आहे. भोसरी व परिसरातील राजकारण व समाजकारण कायम या प्रभागाभोवती फिरत असते, म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या या प्रभागात प्रत्येक रस्त्यावर, पदपथावर पथारीवाल्यांनी ठाण मांडले आहे.
अग्निशामक केंद्र ते चांदणी चौक व चांदणी चौकापासून नाशिक रस्त्याने धावडे वस्तीपर्यंत पथारीवाले, चारआसनी रिक्षा व फळे व भाजीपाला विक्रेत्यांचा विळखा पडला आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळेस नागरिकांना चालत जाणेही मुश्कील होऊन बसले आहे. स्थानिक नगरसेवक हॉकर्स झोनसाठी मागणी करत आहेत. मात्र, हॉकर्स झोन होत नसल्याने नगरसेवक व पदाधिकारी हतबल झाले असून, या ठिकाणी हॉकर्स झोन झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. मात्र, भोसरीतील कारभारी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
गेल्या चार वर्षांपासून या प्रभागात मोठं मोठी विकासकामे झाली आहेत. काही सुरूही आहेत. मात्र, भोसरीच्या रस्त्यावरून जाताना नागरिकांचा श्वास गुदमरल्याशिवाय राहत नाही. यशवंतराव स्मृती रुग्णालयानंतर असणारे सर्वांत मोठे शंभर खाटांचे रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील एकमेव असे मॅटवरील कुस्ती प्रशिक्षण येथील सर्व्हे क्रमांक एक या ठिकाणी होत आहे. अद्ययावत अशी भाजी मंडई उभी राहत आहे.
त्यामुळे या प्रभागाबरोबर भोसरीचा नावलौकिक वाढणार आहे. या प्रभागात नागरिकांना विजेच्या लपंडावाचा कायम सामना करावा लागत असे. यासाठी नगरसेवकांनी पाठपुरावा करून सहा ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर बसवून घेतले. त्यामुळे लाइट जाण्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. मात्र, त्या पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत. महावितरणने अजूनही सर्व लोड ट्रान्सफर
केला नसल्याची माहिती
विद्युत विभागाकडून देण्यात आली आहे. (वार्ताहर)