वाटोळे गरगरीत
By Admin | Updated: July 25, 2015 04:40 IST2015-07-25T04:40:37+5:302015-07-25T04:40:37+5:30
दारूच्या व्यसनातून सुटलेल्या किंवा सुटण्यासाठी धडपडणाऱ्या मित्रांना मुक्तांगणमधे भेटत होतो. त्यांच्या कहाण्या ऐकून वाटत होतं की, दारूनं इतरांचं वाटोळं

वाटोळे गरगरीत
दारूच्या व्यसनातून सुटलेल्या किंवा सुटण्यासाठी धडपडणाऱ्या मित्रांना मुक्तांगणमधे भेटत होतो. त्यांच्या कहाण्या ऐकून वाटत होतं की, दारूनं इतरांचं वाटोळं केलं हे माहिती असतानाही हे सर्रास कसे दारूच्या व्यसनात अडकले.
एका मित्राला त्याची कहाणी ऐकून घेऊन विचारलं, ‘‘मित्रा, तू गेली वीस वर्षं दारू पीत आहेस. दुबई- मस्कत इथल्या प्रचंड पगाराच्या नोकऱ्या तुझ्या हातच्या गेल्या. इतकेच काय, तझ्यावर डी-पोर्ट होण्याची नौबत आली. त्यांनी देशाबाहेर काढलं तुला. आणि एवढं सारं होऊनही तू दारू पीत राहिलास. का..? कशामुळे असं झालं असेल?’’
तो म्हणाला, ‘‘तुम्ही म्हणता ते खरं आहे. मी आजवर अनेकवेळा व्यसनमुक्ती केंद्रात राहिलोय. तिथं मला बरीच माहितीही मिळाली. इतकंच काय, अनुभवांवरून शहाणे झालेले अनेक मित्रही आहेत. पण हे सारं माहिती असूनही माझी दारूबद्दलची ओढ काही कमी झाली नाही. आता पुन्हा गेले चार महिने मी व्यसनमुक्ती केंद्रात राहतोय. अर्थात मी पैसे तिकडे कमावले होते, तेच पैसे खर्चून आता इथं राहतोय!’’
‘‘म्हणजे तुम्हाला असं वाटतं का, की मी सर्व गोष्टी स्वत:च्याच पैशानं करत असल्यानं त्यात फारसं वावगे काही नाही?’’ - मी पुढचा प्रश्न केला.
‘‘गेली अठरा वर्षं मी असाच विचार करायचो. मी पैसे मिळवतो. मी उपचार घेतो तर घरच्यांना काय त्रास? पण आता मी अगदी मनापासून कबूल करतो की दारू हा माझा आजार आहे. माझं जीवन अस्ताव्यस्त झालं आहे. पण मग मला असंही वाटायचं की, मी आजारी आहे ना, मग आजार उसळी मारणारच. त्यातून मी पुन्हा माझ्या दारू पिण्याचं समर्थन करायचो! कितीदा दारू सोडली. कितीदा चूक कबूल केली. कितीदा स्वत:ला सुधरवण्याचे प्रयत्न केले तरी दारू सुटत नाही.’’
‘‘पण तुम्हाला कळते ना आपली चूक, मग तुम्हीच ती सुधारत का नाही..’’ - माझा प्रश्न पुरा होण्यापूर्वीच तो म्हणाला, ‘‘माझं सगळं गणितच चुकतं. कळतं पण वळत नाही मला..!’’
मी विचार करू लागलो, हे असं का व्हावं? असंच सारं सतत चालणार का? कायमचा आजार म्हणजे सतत रिलॅप्स होत राहणार. पण मग इतर हजारो माणसं यातून बाहेर येतात, तर मग यांचीच दारू का सुटत नाही? का पुन्हा पुन्हा ते सारं कळूनही व्यसनांच्या आहारी जातात?
माझी शंका मला सोडत नव्हती. म्हणून मी मुक्तांगण आणि अल्कोहोल अॅनानिमसच्या संपर्कात असलेल्या जयंतला जाऊन भेटलो. त्याला या मित्राची गोष्ट सांगितली. तडकून म्हणालो की, असं कसं करतात ही माणसं?
तो हसून म्हणाला, ‘‘या मित्रानं जी कहाणी सांगितली तशा घटना क्वचित पाहायला मिळतात. पुन्हा पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात ठेवूनही ते व्यसनांकडे जातात याचं महत्त्वाचं कारण त्यांची बुद्धिमत्ता! सामान्यत: जीवनात काही फटके मिळाले तर एका कुठल्या तरी क्षणी दारूसमोर आपण हतबल आहोत हे त्या माणसाला त्याचं त्याला कळतं. मनापासून पटतं. तो क्षण कधी येईल हे सांगता येत नाही. आपण तो क्षण लवकर यावा म्हणून प्रयत्न करत राहायचे. त्यांच्या बाबतीत दुर्दम्य आशावाद ठेवत मदत करीत राहायचं.’’
‘‘पण असं किती दिवस करत राहणार? किती आशा बाळगणार?’’
‘‘त्याला काय इलाज आहे. आता तू सांगतोस तो रुग्णमित्र. गेली वर्षभर त्याला कोणत्याही प्रकाराने मदत करायची नाही असा निर्णय आम्ही घेतला. त्याला बळजबरी व्यसनमुक्तीच्या सभांना घेऊन जाऊ लागलो. त्याच्या वाहनाच्या किल्ल्या, त्याची क्रेडिट कार्ड्स, गळ्यातली सोन्याची साखळी सगळं काढून घेतलं. कोणीही त्याला पैसे देणार नाहीत याची खबरदारी घेतली. तरीही तो पुन्हा व्यसनाकडे वळणार नाही असं नाही, त्यातूनही ते गोंधळ घालतातच!’’
‘‘पण असं का? इतकी शिकली सवरलेली माणसं त्याच त्याच चुका परत परत का करतात? कुठे जाते त्यांची हुशारी? त्यांची विवेकबुद्धी?’’
- हाच तर खरा प्रश्न आहे..
दारूचं व्यसन सर्रास दिसतं, ते सोडण्याचे क्षणही येतात, पण ती पुन्हा पुन्हा आपल्या समाजात अनेकांना गाठते. सुटत का नाही अनेकांची दारू चटकन?
- याच प्रश्नाच्या उत्तराचा माझा शोध अजून सुरूच आहे..
- मनोज कौशिक
सहकार्य- मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे