पतीकडून छळ : चारित्र्यावर संशय, नेपाळी महिलेची आकुर्डीत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:00 IST2018-08-28T00:59:42+5:302018-08-28T01:00:21+5:30
चारित्र्यावर संशय घेऊन पती छळ करीत असल्याने आकुर्डीत राहणाऱ्या नेपाळी महिलेने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पतीकडून छळ : चारित्र्यावर संशय, नेपाळी महिलेची आकुर्डीत आत्महत्या
पिंपरी : चारित्र्यावर संशय घेऊन पती छळ करीत असल्याने आकुर्डीत राहणाऱ्या नेपाळी महिलेने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पवित्रा असे तिचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी या महिलेने मोबाइलमध्ये स्वत:चे संभाषण रेकॉर्ड करून ठेवले आहे. मृत्यूपूर्वी केलेल्या रेकॉर्डिंगच्या आधारे तिने आत्महत्या का केली याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. ही घटना दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळी कुटुंबीय आकुर्डीत वास्तव्यास आहे. पवित्राचा पती तिच्या चारित्र्याचा संशय घेत असे. तसेच मित्र-मंडळींत अपमान करीत असे. या मानहानीला कंटाळून तिने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने मोबाइलमध्ये स्वत:चे संभाषण रेकॉर्ड केले आहे. परंतु नेपाळी भाषेत तिने संभाषण रेकॉर्ड केलेले असल्याने पोलिसांना तिचे म्हणणे नेमके काय आहे, हे समजू शकले नाही. नेपाळी भाषेच्या जाणकाराकडून ते समजून घेतल्यानंतर आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान शहर परिसरामध्ये आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यामध्ये विवाहितांचे प्रमाण जादा आहे.