चौदा लाखांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: October 14, 2016 05:43 IST2016-10-14T05:43:12+5:302016-10-14T05:43:12+5:30
एक व्यक्ती पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकाने लाखोंचा बेकायदा साठा केलेला गुटखा

चौदा लाखांचा गुटखा जप्त
पिंपरी : एक व्यक्ती पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकाने लाखोंचा बेकायदा साठा केलेला गुटखा जप्त केला आहे. विशेष म्हणजे जी व्यक्ती पिस्तूल घेऊन येणार होती, त्या व्यक्तीच्या गोदामातूनच युनिट तीनच्या पथकाने सुमारे १४ लाख, १६ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. ओमप्रकाश पुखराज माळी (वय ४०, रा. भिसे कॉलनी, पिंपळे सौदागर) असे या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई पिंपळे सौदागर येथे करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पिंपळे सौदागर येथील बोरापार्क इमारतीमध्ये एक व्यक्ती दुपारी पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सकाळी ११च्या सुमारास सापळा रचला. आरोपीला पकडण्यासाठी दबा धरून थांबले असता, एक जण त्या ठिकाणी आला. पळून जाऊन तो शटर उचकटून एका गोदामात शिरला. पोलिसांना त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनीही पाठोपाठ गोदामात प्रवेश करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी गोदामाची तपासणी केली असता, विविध प्रकारच्या गुटख्याची पोती, तसेच बॉक्समध्ये भरलेला बेकायदा गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला घटनेची माहिती देऊन, त्या ठिकाणी बोलावले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे १४ लाख, १६ हजार ७०० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम मोरे, रवींद्र बाबर, शिवाजी राहीगुडे, गुणशिलंम रंगम यांनी केली आहे.(प्रतिनिधी)