शालेय साहित्य खरेदीला हिरवा कंदील
By Admin | Updated: October 28, 2015 23:43 IST2015-10-28T23:43:38+5:302015-10-28T23:43:38+5:30
शालेय साहित्य खरेदीच्या निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, शालेय साहित्याचे वाटप करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत

शालेय साहित्य खरेदीला हिरवा कंदील
पिंपरी : शालेय साहित्य खरेदीच्या निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, शालेय साहित्याचे वाटप करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत. त्यामुळे नवीन निविदा प्रक्रिया राबवून दिवाळीनंतर साहित्य वाटप करण्यात योईल, अशी माहिती शिक्षण मंडळाचे सभापती चेतन घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिक्षण मंडळाने १८ मे २०१५ रोजी शालेय साहित्य खरेदीच्या निविदा जाहीर केल्या होत्या. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुन्हा फेरनिविदा मागविण्यात आली होती. ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच खरेदी नियमबाह्य असल्याचा आक्षेप घेऊन निविदा प्रक्रिया रद्द करावी, यासाठी उच्च न्यायालयात आॅगस्टमध्ये याचिका दाखल केली होती. साहित्य खरेदीला स्थगिती दिल्याने शिक्षण मंडळाने प्रक्रिया थांबविली होती.
याबाबत सभापती घुले म्हणाले, ‘‘न्यायालयीन प्रक्रियेमुळे साहित्य वाटपाला विलंब होऊ नये, यासाठी आम्ही निविदा प्रक्रिया पुन्हा राबवण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. या मागणीवर आज सुनावणी झाली. शिक्षण मंडळाची मागणी मान्य करीत नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम केले जाईल. ई- निविदा पद्धतीने काम सुरू केले आहे. दर्जेदार कंपन्यांचा यात समावेश करण्यात येईल. नव्या निविदेमध्ये विद्यार्थ्यांना दप्तरे, शूज, रेनकोट, वह्या, प्रयोगवही, साहित्याचा यामध्ये समावेश करण्यात येईल.’’
उपसभापती शिवले म्हणाले, ‘‘शालेय साहित्याचे वाटप रखडल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते. विद्यार्थ्यांची अधिक गैरसोय होऊ नये, याबाबतची भूमिका शिक्षण मंडळाच्या वतीने मांडण्यात आली.’’ या वेळी नाना शिवले, श्याम आगरवाल, विष्णुपंत नेवाळे, विजय लोखंडे, चेतन भुजबळ आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)