गोव्यातील महिलेची पोलिस चौकीत आत्महत्या; मुलीच्या अपहरणाचा होता आरोप
By नारायण बडगुजर | Updated: April 17, 2023 22:40 IST2023-04-17T22:40:19+5:302023-04-17T22:40:28+5:30
एक अल्पवयीन मुलगी एका महिलेसोबत असून त्यांचा वावर संशयास्पद आहे, अशी माहिती अहमदनगर येथील चाईल्ड हेल्पलाइनला मिळाली.

गोव्यातील महिलेची पोलिस चौकीत आत्महत्या; मुलीच्या अपहरणाचा होता आरोप
पिंपरी : गोवा येथील एका २९ वर्षीय महिलेने पोलिस चौकीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत निगडी पोलिस ठाण्याच्या ओटास्किम चौकीत सोमवारी (दि. १७) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ वर्षीय मुलगी गोवा येथे तिच्या नातेवाईकांकडे गेली होती. त्यावेळी गोवा येथे एका २९ वर्षीय महिलेशी अल्पवयीन मुलीची ओळख झाली. दरम्यान, अल्पवयीन मुलगी निगडी येथे परत आली. त्यानंतर गोवा येथील महिला निगडी येथे येऊन अल्पवयीन मुलीला घेऊन गेली. मात्र, याबाबत अल्पवयीन मुलीच्या घरच्यांना कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी केली. त्यानुसार निगडी पोलिस ठाण्यात १२ एप्रिल २०२३ रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, एक अल्पवयीन मुलगी एका महिलेसोबत असून त्यांचा वावर संशयास्पद आहे, अशी माहिती अहमदनगर येथील चाईल्ड हेल्पलाइनला मिळाली. त्यानुसार अहमदनगर पोलिसांनी मुलीकडे चौकशी करून तिच्या वडिलांशी संपर्क केला. त्यानंतर मुलीचे वडील आणि निगडी पोलिस अहमदनगर येथे गेले. तेथून अल्पवयीन मुलीला व महिलेला ताब्यात घेऊन निगडी पोलिस ठाण्यात आणले. अल्पवयीन मुलगी व तिच्या आईवडिलांचा जबाब नोंदवून घेण्यासाठी ओटास्किम पोलिस चौकीत नेण्यात आले. जबाब नोंदणीचे कामकाज सुरू असताना २९ वर्षीय महिला चौकीतील स्वच्छतागृहात गेली. मात्र, स्वच्छतागृहातून लवकर बाहेर न आल्याने पोलिसांनी स्वच्छता गृहाचा दरवाजा तोडला. महिलेने स्वच्छतागृहातील लोखंडी अँगलला जर्कीनच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.