मुली बाजीगर
By Admin | Updated: June 18, 2014 02:16 IST2014-06-18T02:16:59+5:302014-06-18T02:16:59+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत पिंपरी-चिंचवड विभागाचा निकाल ९६.७२ टक्के लागला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

मुली बाजीगर
पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत पिंपरी-चिंचवड विभागाचा निकाल ९६.७२ टक्के लागला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली आहे. हवेली, मुळशी, मावळमधील ५८ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मावळचा निकाल ९६.८९ टक्के, मुळशीचा निकाल ९५ टक्के, हवेलीचा निकाल ९६.१६ टक्के लागला आहे.
सोमवारी दुपारी एकला मंडळाकडून इंटरनेटवर निकाल जाहीर झाला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांची शहरातील सायबर कॅफेमध्ये गर्दी झाली होती. निकाल जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये दिसत होती. परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर एका क्लिकवर निकाल मिळत होता. सायबर कॅफेमध्ये निकाल पाहण्यासाठी व गुणपत्रिकेची प्रिंट काढण्यासाठी गर्दी दिसून आली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. अनुत्तीर्णांचे चेहरे हिरमुसलेले दिसत होते. उत्तीर्ण झालेल्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. निकाल जाहीर होताच एसएमएस, फेसबुक, व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
पिंपरी-चिंचवड विभागातील महापालिका व खासगी अशा १५४ शाळांमधून १५ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी १५ हजार ५६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांपैकी १५ हजार ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहराचा एकूण निकाल ९६.७२ टक्के लागला. गतवर्षी ८९.६० टक्के निकाल होता. त्यात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)