सफाई कामगारांच्या आरोग्याशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:00 IST2018-07-19T23:59:26+5:302018-07-20T00:00:34+5:30
कचरा गोळा करून परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात आहे.

सफाई कामगारांच्या आरोग्याशी खेळ
सांगवी : सांगवी परिसरातील आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वच्छता विभागातील कचरावेचक आणि घंटागाडी कर्मचारी यांच्या आरोग्याच्या बाबतीत पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. महापालिका हद्दीतील घरोघरी, गल्लीबोळात घंटागाडी आपणास कचरा गोळा करताना दिसून येतात; पण स्वच्छता विभागातील या कचरा गोळा करून परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाºयांचे आरोग्य मात्र धोक्यात आहे.
भर पावसात कचºयात काम करताना आरोग्य कर्मचाºयांचेच आरोग्य धोक्यात आलेले दिसून येत आहे. सकाळी लवकर उठून हे कर्मचारी घंटागाडीसोबत कचरा, घाण गोळा करतात. कोणतेही हातमोजे, पायात रबरी बूट नसताना हे कर्मचारी ऊन-पावसात राबताना दिसून येतात. काम करताना घाण हातांच्या नखात जाते, त्याच हातांनी जेवण केल्याने अनेक दुर्धर संसर्गजन्य रोगाची लागण होण्याची शक्यता दिसून येते.
आपल्या परिसरातील साफसफाई राखणाºया कर्मचाºयांना मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हातमोजे, टोपल्या व इतर अनेक प्रकारची सुविधा साधने महापालिकेने, तसेच संबंधित ठेकेदाराकडून देणे बंधनकारक असताना, कर्मचाºयांच्या आरोग्याला घातक असतानाही कर्मचाºयांच्या जिवाशी खेळले जात आहे. नोकरी सांभाळण्यासाठी स्वच्छता कर्मचारीही केरकचरा उचलताना कोणतीही सुविधा साधने नसताना काम करताना दिसून येत आहेत. महापालिकेने कर्मचाºयांना सुविधा साधने द्यावीत, अशी कर्मचाºयांची मागणी आहे.