पिंपरीतही देवदूत चा झोल : अधिकाऱ्यांची चुप्पी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 03:04 PM2019-07-12T15:04:04+5:302019-07-12T15:05:55+5:30

सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सहा गाड्या दाखल असून, त्याचा वापर केवळ झाडे कापण्यासाठी व शॉर्टसर्किट झाल्यानंतरच्या घटनांसाठी काहीवेळा करण्यात येतो.

fraud in devdoot cars of pimpri chinchwad | पिंपरीतही देवदूत चा झोल : अधिकाऱ्यांची चुप्पी

पिंपरीतही देवदूत चा झोल : अधिकाऱ्यांची चुप्पी

Next
ठळक मुद्देआवश्यकता नसताना १० कोटींना सहा गाड्यांची खरेदी

हणमंत पाटील
पिंपरी : आपत्कालीन विभागाची आवश्यकता आणि मागणी नसतानाही ' देवदूत ' गाड्या खरेदीचा पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील झोल समोर आला आहे. याविषयी अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला असून, पुण्यातील त्याच ठेकेदार कंपनीकडूनही मूळ किमतीपेक्षा अधिक दराने प्रत्येकी पावणे दोन कोटी याप्रमाणे ९ कोटी ९८ लाख रुपयांना सहा देवदूत गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. 
पिंपरी-चिंचवड महापालिकेची लोकसंख्या व क्षेत्रफळ पुण्यापेक्षा निम्म्याने कमी आहे. तरीही पुणे महापालिकेला सहा देवदूत गाड्या देणाऱ्या ठेकेदार कंपनीने पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे आग्रह धरला होता. त्यानुसार २०१६-१७ च्या स्थायी समितीसमोर सहा देवदूत गाड्यांचा प्रस्ताव आला. परंतु, अग्निशामक विभागाने या गाड्यांपेक्षा आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या गाड्या आपल्याकडे उपलब्ध असल्याने देवदूतची आवश्यकता नसल्याचा अभिप्राय दिला होता. यावेळी अधिकाऱ्यांवर दबाव आणत तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी सहा देवदूत गाड्या प्रत्येकी एक कोटी ८३ लाखांने मंजूर केल्या. मात्र, दीड वर्षांपूर्वी पहिल्या टप्प्यात तीन गाड्या दाखल झाल्या. 
दरम्यान, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाले. राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपाची एकहाती सत्ता आली. त्यानंतर पहिल्याच स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देवदूत गाड्या खरेदीला सुरवातीला विरोध केला. त्यानंतर काही दिवसांत झालेल्या घडामोडीनंतर त्यांचा विरोध मावळला. त्यानंतर उर्वरित तीन देवदूत गाड्या सहा महिन्यांपूर्वी अग्निशामक विभागात दाखल झाल्या आहेत. सध्या महापालिकेकडे सहा गाड्या दाखल असून, त्याचा वापर केवळ झाडे कापण्यासाठी व शॉर्टसर्किट झाल्यानंतरच्या घटनांसाठी काहीवेळा करण्यात येतो. त्यापेक्षा अधिक क्षमतेची वाहने अग्निशामक विभागाकडे आहेत. त्यामुळे देवदूत गाड्यांचा विशेष उपयोग होत नसल्याचे अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, या गाड्या खरेदीमागे कोणती यंत्रणा कार्यरत आहे, याविषयी अधिकारी उघडपणे बोलण्यास धजावत नाहीत.
 कंपनीकडून सव्वा कोटींचे मशीन खरेदीचा डाव
अँड एनव्हायरो सोल्युशन प्रा. लि. ही कंपनी वादात सापडली आहे. याच कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ, ब आणि क या तीन क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मलनिस्सारण नलिका मॅकहोल चेंबर्सच्या साफसफाईसाठी आधुनिक यांत्रिकी पद्धतीने काम करण्याचा ठेका देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला आहे. 

साफसफाईसाठी आवश्यक असलेले हे मशीन खरेदीसाठी १ कोटी २९ लाख आणि प्रति दिन ४३ हजार खचार्ची ही निविदा आहे.  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी एका बाजूला बैठकांवर बैठका सुरू आहेत.
दुसऱ्या बाजूला स्थायी समितीमार्फत ठेकेदारांवर उधळपट्टीचे प्रस्ताव एकामागून एक सादर करण्यात येत आहेत. पिंपरी महापालिकेच्या जलनिस्सारण विभागाकडून मलनिस्सारण नविका मॅनहोल चेंबर्सच्या सफासफाईसाठी आधुनिक यांत्रिकी पद्धतीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. यावेळी मे आर्यन पंप्स अँड एन्व्हायरो सोल्युशन प्रा. लि. (पुणे) आणि मे. मेट्रो वेस्ट हॅण्डलिंग प्रा. लि. (दिल्ली) या कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. मात्र, सात दिवसांनंतर फेरनिविदा काढण्यात आली. 

अ, ब आणि क क्षेत्रीय कार्यालयांसाठी आर्यन कंपनीची एकच निविदा प्राप्त झाली. ही कंपनी अटी शर्तीमध्ये 
बसत असल्याचा दावा संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता व सहशहर अभियंता यांचा अभिप्राय आहे.

आर्यन कंपनीमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या सेक्शन, जेटिंगसह रिसायकलिंग मशीनचे प्रत्यक्षिक अद्याप घेण्यात आलेले नाही. तरीही संंबंधित ठेकेदार कंपनीला तीन क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक कोटी ३५ लाख ऐवजी १ कोटी २९ लाख आणि प्रति दिन ४६ हजार ५३० ऐवजी ४३ हजार खचार्चा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे संबंधित कंपनीबरोबर पुढील सात वर्षांसाठी करार करण्यात येणार असून, आणखी दोन क्षेत्रीय कार्यालयाच्या जलनिस्सारण विभागाचे काम देण्याचाही अधिकाऱ्यांचा डाव असल्याची चर्चा आहे. स्थायीचे पदाधिकारी उधळपट्टीच्या या प्रस्तावावर काय निर्णय घेणार याविषयी उत्सुकता आहे.


देवदूत संचलनाच्या प्रस्तावास नकार
पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेतही देवदूत गाड्यांची खरेदी ज्या ठेकेदारामार्फत करण्यात आली. संबंधित ठेकेदाराने पिंपरी महापालिकेलाही देवदूत गाड्यांचे संचलन, देखभाल-दुरुस्ती व मनुष्यबळ देण्याचा प्रस्ताव दिला होता. 
मात्र, अग्निशामक विभागाने नकारात्मक अभिप्राय देत संबंधित गाड्यांचे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत संचलन करण्यात येणार असल्याचा प्रस्ताव दिला. त्यानुसार एका गाडीसोबत महापालिकेचे चालकासह पाच कर्मचारी कार्यरत आहेत.

Web Title: fraud in devdoot cars of pimpri chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.