चौपदरीकरण ठरतेय ‘काळ’
By Admin | Updated: July 24, 2015 04:25 IST2015-07-24T04:25:20+5:302015-07-24T04:25:20+5:30
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम ११ वर्षांपासून रखडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, सव्वासहा किलोमीटरचा

चौपदरीकरण ठरतेय ‘काळ’
देवराम भेगडे ल्ल किवळे
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानचे चौपदरीकरणाचे काम ११ वर्षांपासून रखडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, सव्वासहा किलोमीटरचा दुपदरी रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर रस्ते विकास महामंडळ महामार्गाचे चौपदरीकरण करणार, असा संतप्त सवाल वाहनचालकांतून व स्थानिकांतून उपस्थित केला जात आहे. एक महिन्यापूर्वी (जून महिन्यात) आश्वासन देऊनही संरक्षक बाजूपट्ट्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण रखडले आहे. दरम्यान, या अरुंद रस्त्यावरील विविध अपघातांत एकाच महिन्यात चार जणांचे बळी गेले असून तीसहून अधिक जखमी झाले आहेत.
रस्ते विकास महामंडळाने महामार्ग क्रमांक चारचा निगडी ते शिळफाटा (ठाणे) हा किलोमीटर क्रमांक २०/४०० ते १३१/२०० दरम्यानचा रस्ता म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे ९ आॅगस्ट २००४ ला झालेल्या एका करारानुसार ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ तत्त्वावर चौपदरीकरण करण्यासाठी दिला होता. सदर रस्त्याचे विविध ठिकाणी काम अपूर्ण असताना सप्टेंबर २००६ पासून या महामार्गावर टोलवसुली सुरू आहे. निगडी जकात नाका ते देहूरोड पोलीस ठाण्यापर्यंतच्या (२०/४०० ते २६/६००) सव्वासहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू झालेले नाही. केवळ डांबरीकरणाचे काम करण्यात आलेले आहे.
त्यातच हा रस्ता अरुंद असल्याने आणि रस्त्याच्या दोन्ही संरक्षक बाजूपट्ट्या ( साइडपट्ट्या ) व मुख्य डांबरी रस्ता यात विविध ठिकाणी अंतर पडले असल्याने दुचाकीस्वारांचे अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असून, दोनशेहून अधिक व्यक्तींना प्राण गमवावे लागल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. तर, अनेकांना कायमचे अपंगत्व आलेले असून, त्यांनी आजतागायत दवाखान्याच्या बिलापोटी लाखो रुपये घालवले आहेत. ११ फेब्रुवारीला एकाच दिवशी निगडी ते देहूरोड येथील केंद्रीय विद्यालय दरम्यानच्या टप्प्यात झालेल्या तीन अपघातांपैकी एका अपघातात किवळे व देहूरोड परिसरात राहणाऱ्या दुचाकीवरील दोन युवकांना प्राणास मुकावे लागले असून, इतर दोन अपघातात सात जण जखमी झाले होते. तर, गेल्या महिन्यातील २० जूनला देहूरोडला एका इसमास एसटी बसने ठोकरले होते. बुधवारी दुचाकीवरून चाललेल्या तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्राणास मुकावे लागले असून, गेल्या महिन्याभरात तीसहून अधिक जखमी झाले आहेत. या अरुंद रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात होतच आहेत. देहूरोड बाजारपेठ परिसरात महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून सर्व अतिक्रमणे दीड वर्षांपूर्वी हटविण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही रस्त्यालगत विविध ठिकाणी राडारोडा पडलेला आहे. स्वामी विवेकांनद चौक व जुन्या बँक आॅफ इंडिया चौकातही सातत्याने अपघात होत आहेत. स्थानिक नागरिकांना व वाहनचालकांना नियमित होणाऱ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. देहूरोड आयुध निर्माणी मुख्य प्रवेशद्वार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालया दरम्यान उड्डाणपूल उभारण्याची मागणी अनेक व्यक्ती व संघटना यांनी वेळोवेळी केली आहे. मात्र, सर्वांना आश्वासनाव्यतिरिक्त काहीही मिळाले नाही. महामार्गाचे चौपदरीकरण व उड्डाणपूल बांधण्याबाबत मंजुरी मिळाल्याचे वारंवार सांगितले जात असून, गेल्या वर्षभरात महामंडळाला भूमिपूजनालाही मुहूर्त सापडलेला नाही. महामंडळाचे अधिकारी व पदाधिकारी आंदोलनाच्या वेळी वेगवेगळी माहिती पुढे करून वेळकाढूपणा करीत असल्याचे मुंबईत झालेल्या एका बैठकीत स्पष्ट झाले आहे. या महामार्गाला पर्याय म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग उभारणी झाल्यानंतर या महामार्गावरील बहुतांशी वाहतूक कमी होईल, असा अंदाज बांधला जात होता.
११ वर्षांपूर्वी चौपदरीकरण काम सुरू झाल्यानंतर देहूरोड-निगडी दरम्यानच्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळत नसल्याचे कारण संबंधितांकडून वेळोवेळी पुढे केले जात होते. राज्यात व केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना मागील १० वर्षांत रुंदीकरणासाठी अनेकदा तत्त्वत: मंजुरी मिळाली असल्याबाबत अनेकदा सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषदा घेऊन जाहीर केले होते. मात्र, हवा असणारा निधी न मिळाल्याने रुंदीकरण होऊ शकले नव्हते. तर, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारकडून हवा असणारा निधी उपलब्ध होणार असल्याचे संबंधित पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा जाहीर होऊनही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.