स्मार्ट सिटीसाठी पाठपुरावा सुरूच!
By Admin | Updated: February 6, 2016 01:32 IST2016-02-06T01:32:11+5:302016-02-06T01:32:11+5:30
अजूनही प्रयत्न सुरू आहेत, मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्याकडे पाठपुरावा करून ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा सूर पुन्हा एकदा खासदार, आमदारांनी आळवला.

स्मार्ट सिटीसाठी पाठपुरावा सुरूच!
पिंपरी : अजूनही प्रयत्न सुरू आहेत, मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्याकडे पाठपुरावा करून ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा सूर पुन्हा एकदा खासदार, आमदारांनी आळवला. या योजनेच्या यादीत पुण्याला दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले. मात्र, पिंपरी-चिंचवडला यामधून डावलले. लोकप्रतिनिधी मात्र शहराच्या समावेशाबाबत प्रयत्नशील असल्याचे बोलत आहेत. नागरिकांना मात्र स्मार्ट सिटीत समावेशाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)‘स्मार्ट सिटी’चा विषय अजून संपलेला नाही. पहिल्या यादीत पिंपरी-चिंचवडचे नाव आले नसले, तरी दुसऱ्या यादीत नक्की येईल. त्यासाठी जोरदार पाठपुरावा करणार आहे. सुरुवातीला शहराचे नाव जाहीर झाले त्या वेळी आम्ही केलेल्या विकासामुळेच जाहीर झाल्याचा डांगोरा राष्ट्रवादी काँगे्रसने पिटला. ‘चांगले केले, तर आम्ही केले अन् वाईट झाले की, दुसऱ्यांनी केले, अशी दुटप्पी भूमिका राष्ट्रवादीची आहे. मात्र, आम्ही प्रयत्न सोडणार नाही.
- अमर साबळे (खासदार, राज्यसभा)
‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश झाल्यास निश्चितच शहराला फायदा होणार आहे. पहिल्या टप्प्यात संधी मिळाली नसली, तरी दुसऱ्या टप्प्यात शहराचा समावेश होईल. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पाठपुरावा करीत राहणार आहे.- श्रीरंग बारणे (खासदार, मावळ लोकसभा) शहराचा ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश होण्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच आग्रही आहोत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडचाही समावेश झाल्यास शहराला स्मार्ट करता येईल. शहराचाही स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत राहणार आहे.
- गौतम चाबुकस्वार (आमदार, पिंपरी)
मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले आहे. या योजनेत समावेश झाल्यास अधिक गतीने विकास करणे शक्य होईल. नवीन प्रकल्प राबविता येतील. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे.
- महेश लांडगे (आमदार, भोसरी)