उड्डाणपूल, रस्ते कामांतून कोटींची उड्डाणे
By Admin | Updated: February 19, 2016 01:20 IST2016-02-19T01:20:54+5:302016-02-19T01:20:54+5:30
महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीची सध्या कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू आहेत. ही उड्डाणे विशेषत:

उड्डाणपूल, रस्ते कामांतून कोटींची उड्डाणे
पिंपरी : महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीची सध्या कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू आहेत. ही उड्डाणे विशेषत: मोठ्या खर्चाचे उड्डाणपूल आणि रस्ते यांच्या माध्यमातूनच घेतली जात आहेत. गेल्या पंधरा दिवसांत स्थायी समितीने तब्बल १८० कोटींच्या कामांना मंजुरी दिली. स्थायीच्या कोट्यवधींच्या उड्डाणांमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
स्थायी समितीचे आठ सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे मोठ्या खर्चाचे विषय मंजुरीचा सपाटा सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यांतील स्थायीच्या सभेत पावणेदोनशे कोटींच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. अधिक खर्चाचे विषय समितीपुढे ठेवण्यासाठी सदस्यांची धडपड सुरू आहे. सभा सुरू होण्यास चार-चार तास उशीर होत आहे. यामुळे अधिकाऱ्यांनाही ताटकळत बसावे लागत आहे. गेले दोन आठवडे झाले, हाच प्रकार पाहावयास मिळत आहे. अखेरच्या टप्प्यात जोरदार बॅटिंग करण्याच्याच इराद्याने सदस्य येत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
मागील आठवड्यातील ११ फेबु्रवारीला झालेल्या स्थायी समिती सभेत अजेंड्यावरील ९३ आणि ऐनवेळचे तब्बल ५५ अशा एकूण १४५ विषयांना वीस मिनिटांत मंजुरी देण्यात आली. यामध्ये ऐनवेळच्या तब्बल ६० कोटींच्या खर्चाचा, तर अजेंड्यावरील सुमारे २० कोटींच्या खर्चाच्या विषयांचा समावेश आहे. अधिकाधिक खर्चाचे विषय येण्यासाठी सदस्यांनी आयुक्तांचीही भेट घेतली.
वाकड अंडरपास ते महापालिका हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी तब्बल सतरा कोटी, चऱ्होली येथे मैलाशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी १९ कोटी, ताथवडे येथे मैलाशुद्धीकरण केंद्र व पंप हाऊस उभारणे, जुन्या पंप हाऊसचे मजबुतीकरण करणे या कामासाठी येणाऱ्या १५ कोटी या खर्चाचा समावेश आहे. या खर्चासह अजेंड्यावरील तब्बल २० कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे ११ फेबु्रवारीच्या सभेत स्थायीने सुमारे ऐंशी कोटींच्या विकासकामांचा फडशा पाडला.
स्थायी समितीच्या १७ फेब्रुवारीला झालेल्या सभेतही स्थायीने सुमारे शंभर कोटींचा ‘विकास’ केला. यात उड्डाणपुलांच्या मोठ्या खर्चाच्या विषयांचा समावेश आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक या दरम्यानच्या रस्त्यावरील लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या ७७ कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली. यासह दापोडीतील हॅरिस ब्रीज येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, यासाठी येणाऱ्या २२ कोटींच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी बुधवारी तब्बल शंभर कोटींचे ‘उड्डाण’ घेण्यात आले. हे कमी म्हणून की काय, भोसरीतील शीतलबाग येथील पादचारी पुलासाठी येणाऱ्या वाढीव खर्चासही पुन्हा एकदा मुक्तहस्ते मंजुरी देण्यात आली. सुरुवातीला ७१ लाख असलेला खर्च तब्बल साडेसात कोटींवर पोहोचला आहे. अवघ्या साडेतीन वर्षांत हा पादचारी पूल साडेसात कोटींवर पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
स्थायीने दोन आठवड्यांपासून जरा जास्तच वेगाने विकासकामांसाठी ‘धावपळ’ सुरू केली आहे. दोन वर्षांचा कार्यकाल संपत आल्याने सदस्यांची जरा जास्त ‘धावपळ’ सुरू असल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)