नगरसेवकाच्या मुलीकडून पाच लाखांची सुपारी
By Admin | Updated: July 4, 2017 03:56 IST2017-07-04T03:56:44+5:302017-07-04T03:56:44+5:30
पिंपळे गुरव येथे बांधकाम व्यावसायिक योगेश शेलार यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले.

नगरसेवकाच्या मुलीकडून पाच लाखांची सुपारी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिपंरी : पिंपळे गुरव येथे बांधकाम व्यावसायिक योगेश शेलार यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले. या प्रकरणाची प्रमुख सुत्रधार पुण्यातील माजी नगरसेवकाची मुलगी आदिती गायकवाड हिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र ती याप्रकरणी काहीच माहिती देत नव्हती. गोळीबार करणारे हल्लेखोर कोण, याचा शोध घेण्यात सांगवी पोलीस कमी पडले. त्यामुळे हा तपास गुन्हे शाखा युनिट चारकडे वर्ग केला. गुन्हे शाखेच्या पथकाने चार आरोपींना जेरबंद केले. त्यांना न्यायालयाने ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अटक आरोपींमध्ये आदिती गायकवाड (वय २२, गायकवाडनगर, औंध, पुणे) हिच्यासह सौरभ शिंदे (वय २०, सिद्धकमल निवास, नवी सांगवी, पुणे), प्रणव गावडे (वय १९, चिखली प्राधिकरण, पुणे), आशुतोष ऊर्फ बंटी मापारे (वय १९, भैरवनगर, धानोरी, पुणे) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता, शेलार यांना जिवे मारण्याचा कट केला असल्याची माहिती पुढे आली. त्याचबरोबर शेलार यांना जिवे मारण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिली असल्याचीही आरोपींनी कबुली दिली आहे.