Influenza Virus: एच३एन२चा पहिला बळी; पिंपरी चिंचवडमध्ये ज्येष्ठाचा मृत्यू
By विश्वास मोरे | Published: March 16, 2023 05:04 PM2023-03-16T17:04:52+5:302023-03-16T17:05:02+5:30
एच३एन२ चे संकट आल्याने महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क
पिंपरी : कोरोनानंतर शहरावर आता एच३एन२चे संकट आले आहे. साथीच्या आजाराने भोसरी परिसरात ७३ वर्षीय वृद्धांचा पहिला बळी या घेतला आहे. त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरातील सहा रुग्णालयांमध्ये उपचाराची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान वैद्यकीय विभागाने केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात ९ मार्च २०२० ला राज्यात पहिल्यांदा कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या. कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाल्याने कोरोनाचा आलेख कमी झाल्यानंतर आता एच३एन२ चे संकट आले आहे. त्यात पहिला बळी गेला आहे.
भोसरी येथे राहणाºया ७३ वर्षीय रुग्णास महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता, एच३एन२ची बाधा झाली आहे. असे निदान झाले. त्यानंतर फुफुस निकामी झाले तसेच त्यांना अन्य हृदयांचे आजार होते. उपचारादरम्यान वृद्धांचा मृत्यू झाला आहे.
अधिवेशन सोडून आमदार शहरात
एच३एन२ चे संकट आल्याने महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये एकाचा बळी गेल्याने आमदार महेश लांडगे मुंबईहून तातडीने पिंपरी-चिंचवडकडे रवाना झाले आहेत. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याबरोबर बैठक घेणार आहेत.