भिशीवाल्यांची उडाली तारांबळ
By Admin | Updated: November 13, 2016 04:22 IST2016-11-13T04:22:41+5:302016-11-13T04:22:41+5:30
काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी हजार, पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला. त्यानंतर जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणि नवीन नोटा

भिशीवाल्यांची उडाली तारांबळ
पिंपरी : काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी हजार, पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला. त्यानंतर जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणि नवीन नोटा बँकेतून घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँकांमध्ये नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत.
दरमहा भिशी चालविणारे या महिन्यात अडचणीत आले आहेत. ज्याला भिशी लागली आहे, तो चलनातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्यास तयार नाही. नव्याने चलनात आलेल्या नोटा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या महिन्यातील भिशीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
भिशीच्या माध्यमातून दरमहा कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होत असते. अगदी १२ पासून ते ५० लोक एकत्र येऊन भिशी चालवतात. वर्षातून एकदा किंवा दोनदा भिशी नंबर काढला जातो. एकूण सदस्यांची जमा होणारी एकत्रित रक्कम ज्याला नंबर लागला आहे, त्याला दिली जाते. व्यापारी, उद्योजक यांची भिशीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. व्यवसायासाठी लागणारी रक्कम अशा भिशीच्या माध्यमातून उभी केली जाते. मोठी रक्कम बँकेत ठेवल्यास अडचण निर्माण होऊ शकते, ही भीती त्यांच्यापुढे आहे. (प्रतिनिधी)
सावकारही अडचणीत
प्रतिदिन विशिष्ट टक्केवारीने कोट्यवधींची रक्कम व्याजाने देणारे सावकार शहरात आहेत. व्याजाने फिरवलेल्या रकमा आणि त्यावरील व्याज वसूल करण्यात या सावकारांना अडचणी येत आहेत. ज्यांना व्याजाने पैसे दिले आहेत, त्यांच्याकडून आगाऊ तारखेचे धनादेश सावकारी व्यवसाय करणाऱ्यांनी ठेवून घेतले आहेत. मुद्दलाची रक्कम नंतर घेता येईल, अशी मानसिकता करून सावकार निश्चिंत असले तरी दरमहा, दररोज जमा होणारी व्याजाची रक्कम मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. व्याजाने देण्यासाठी घरात कायम ठेवण्यात येणाऱ्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत. त्यामुळे सावकारांचे व्याजावर रक्कम देण्याचे व्यवहार थांबले आहेत.