पिंपरी : खोटे पुरावे देऊन बॅंकेत खोटे खाते उघडले. त्यानंतर फायनान्स कंपनीकडून २१ लाख ५० हजारांचे कर्ज घेत फायनान्स कंपनीची फसवणूक केली. तळेगाव दाभाडे येथे ६ ऑगस्ट २०२१ ते २१ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ही घटना घडली.
अमित चंद्रकांत साळवे (वय ३१, रा. चिखलसे, कामशेत, ता. मावळ) यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. २१) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, रणजीत धर्मराज कोरेकर, संजयकुमार सुरजलाल पटले आणि त्यांच्या दोन साथिदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी खोटे पत्ते, बनावट कागदपत्रे देऊन बँकेचे खाते चालू केले. तसेच कोहीनफाई या कंपनीची बनावट ओळखपत्रे तयार केली. त्यानंतर आरोपींनी आयडीबीआय बँक आणि युनियन बँकेमध्ये तुकाराम शिंदे आणि स्नप्नील पडीले यांच्या नावाने बनावट खाते उघडले. या खात्यांद्वारे आरोपींनी बजाज फायनान्स कंपनीकडून मोबाईल, होम थिएटर, घरगुती वस्तू, वैयक्तिक कर्ज घेऊन कंपनीची २१ लाख ५० हजारांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.