बिल्डरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 15, 2015 04:25 IST2015-09-15T04:25:51+5:302015-09-15T04:25:51+5:30
दुकानगाळ्यासाठी ६७ लाख ७५ हजार रुपये अदा केले असताना, चार वर्षांत दुकानाचा गाळा दिला नाही. केवळ करारनामा करून फसवणूक केली, असा आरोप करून एमबीएम

बिल्डरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
पिंपरी : दुकानगाळ्यासाठी ६७ लाख ७५ हजार रुपये अदा केले असताना, चार वर्षांत दुकानाचा गाळा दिला नाही. केवळ करारनामा करून फसवणूक केली, असा आरोप करून एमबीएम डेव्हलपर्सचे संचालक खेमचंद उत्तमचंद भोजवानी, कन्हैयालाल मतानी यांच्याविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपाचा बांधकाम व्यावसायिक भोजवानी आणि मतानी यांनी इन्कार केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमबीएम डेव्हलपर्सचे भोजवानी, मतानी यांच्याविरुद्ध चंदू लक्ष्मण रामनानी यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. गाळ्यासाठी वेळोवळी धनादेशाद्वारे रक्कम अदा केली असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. ज्या ठिकाणी पिंपळे सौदागर येथे इमारतीचे काम केले जाणार होते, त्या इमारतीचे बांधकामच सुरू झाले नाही. ठरल्यानुसार २०१२पर्यंत दुकानाचा ताबा आणि सदनिकाही नाही, असे रामनानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.(प्रतिनिधी)
रामनानी हे दिशाभूल करत आहेत. ते आमच्या फर्ममध्ये भागीदार आहेत. मंचर येथे सुरू असलेल्या प्रकल्पातही ते भागीदार आहेत. भागीदार म्हणून ते काही रक्कम गुंतवतात. नंतर त्याचा ‘ब्लॅकमेलिंग’साठी उपयोग करतात.
- भोजवानी, एमबीएम डेव्हलपर्स