गावकारभाऱ्यांचे नशीब आज उघडणार
By Admin | Updated: August 6, 2015 03:37 IST2015-08-06T03:37:05+5:302015-08-06T03:37:51+5:30
जिल्ह्यातील सुमारे ६१९ ग्रामपंचायतींचे कारभारी कोण, हे आज ( ६ आॅगस्ट) सायंकाळी ५ पर्यंत स्पष्ट होईल. गावकारभाऱ्यांचे नशिब आज उघडणार

गावकारभाऱ्यांचे नशीब आज उघडणार
पिंपरी/पुणे : जिल्ह्यातील सुमारे ६१९ ग्रामपंचायतींचे कारभारी कोण, हे आज ( ६ आॅगस्ट) सायंकाळी ५ पर्यंत स्पष्ट होईल. गावकारभाऱ्यांचे नशिब आज उघडणार असल्याने उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार याबाबत गावा गावात मोठ्याप्रमाणात चर्चा होत आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही मतमोजणी होणार यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यात आॅगस्ट ते आॅक्टोबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७०३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यांपैकी ८३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. यामुळे ४ आॅगस्ट रोजी ६२० ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले.
गावकीच्या या निवडणुका गावकारभाऱ्यांनी चांगल्याच प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. एकाच पक्षाचे अनेक गट एकमेका विरोधात लढल्याने मतदारांनी कोणाच्या बाजूने कल दिला याकडे लक्ष लागले आहे. चुरशीने लढवलेल्या या निवडणुका शांततेत पार पडल्या मतदानालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
बारामती : बारामतीत मतमोजनी देखील शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. एमआयडीसीतील रिक्रिएशन हॉल येथे बंदोबस्तासाठी ८० पोलिस कर्मचारी, ८ एपीआय आणि पिएसआय व दोन पोलिस निरिक्षक असणार आहेत. त्याचप्रणाणे ज्या गावांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. त्याठिकाणी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच कार्यकर्त्यांनी अचारसंहीता पाळावी, मिरवणुका काढू नयेत. असे आवाहनही तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक चंद्रकांत कांबळे यांनी केले आहे.
मावळ : ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पडल्यानंतर आता निकालाची उत्कंठा वाढली आहे. सर्व उमेदवारांचे भवितव्य आज उघडणार आहे. कोण ‘मेंबर’ होणार... कोण पडणार यावर कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागत आहेत. रोख रकमेपासून पार्टी ते कलाकेंद्रात जाण्यापर्यंत पैजा लागल्या आहेत. या धामधुमीत उमेदवार मात्र ‘नॉट रिचेबल’ आहेत. पंधरा दिवसांमध्ये झालेल्या खर्चाचा हिशोब काढता काढता उमेदवारांचेच डोळे पांढरे झाले आहेत. तर अनेकजणांना निकालाची धास्ती लागली आहे.
मतदान शांततेत पार पडल्यानंतर गावा गावात आता निकालाच्या चर्चा झडू लागल्या आहेत. या चर्चेमध्ये ‘कोणाची जिरणार’ ‘कोण मातब्बर ठरणार’ याविषयी तावा तावाने मत व्यक्त होताना दिसत आहे. काही कार्यकर्त्यांनी तर पैजा लावल्या आहेत. वारेमाप खर्च करून प्रचार केलेले उमेदवार आता खर्चाचा हिशोब काढत आहेत. एवढा खर्च करूनही ‘सिट’ पडले तर या विचाराने उमेदवारांची घाबरगुंडी उडत आहे. मतदानोत्तर खबर देणारे काही स्थानिक खबरे सामसुम दिसत आहेत. त्यामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
गावकीच्या निवडणुकाही आता प्रतिष्ठेच्या होऊ लागल्या आहेत. अगदी लाखांच्या घरात उमेदवारांनी प्रचारावर खर्च केला. त्यामुळे ढाबे, हॉटेल चालकांची चांदी झाली. काही ठिकाणी मताला दरही फुटला. शेकड्याने किंवा अगदी हजाराने मत खरेदीही झाली. कार्यकर्त्यांनी यामध्ये गफलत तर केली नाही ना अशी भीतीही उमेदवार बोलून दाखवत आहेत. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ग्रामस्थांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या आहेत. कुणी पैशांची, कुणी पार्टीची तर कुणी अगदी कलाकेंद्रावर जाण्यापर्यंत पैजा लावल्या आहेत. या धामधुमीत मतदान यंत्रामधील कौल नेमका कोणाच्या बाजुने जाणार या विचाराने उमेदवारांचा जीव कासावीस झाला आहे. (वार्ताहर)