गावकारभाऱ्यांचे आज ठरणार भवितव्य

By Admin | Updated: August 4, 2015 03:44 IST2015-08-04T03:44:29+5:302015-08-04T03:44:29+5:30

मावळ तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी (दि. ४) निवडणूक होत आहे. सोमवारी सकाळपासून मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना सूचना

The fate of villagers will be decided today | गावकारभाऱ्यांचे आज ठरणार भवितव्य

गावकारभाऱ्यांचे आज ठरणार भवितव्य

गहुंजे : मावळ तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी (दि. ४) निवडणूक होत आहे. सोमवारी सकाळपासून मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना सूचना देऊन साहित्य वाटप करण्यात आले असून, मतदान केंद्रांवर कर्मचारी व अधिकारी दाखल झाले आहेत. सायंकाळपर्यंत केंद्रांवरील मतदान यंत्रणा सज्ज झाली होती. मतमोजणी गुरुवारी (दि. ६) होणार आहे.
गहुंजे व सांगवडे येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चाचणी मतदान (मोक पोल) घेण्यात कर्मचारी मग्न झाल्याचे चित्र होते. गहुंजेत चार, सांगवडेत तीन मतदान केंद्रे आहेत. तळेगाव पोलीस ठाण्यामार्फत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, भरारी पथके रात्रंदिवस गस्त घालीत आहेत.
निवडणुकीसाठी नेमण्यात आलेले सर्व कर्मचारी मतदान यंत्रे व साहित्य घेऊन नेमून दिलेल्या केंद्रांकडे रवाना झाले. पोलीस कर्मचारी व अधिकारीही दाखल झाले आहेत. मतदान केंद्रावर खोली क्रमांक, नमुना मतपत्रिका, सूचना, मतदान कक्ष बसविण्याचे काम करण्यात कर्मचारी मग्न होते. सायंकाळपर्यंत सर्व तयारी पूर्ण झाली होती. गहुंजेतील प्रभाग क्रमांक एकमध्ये ५२१ , प्रभाग क्रमांक दोनमध्ये ३२३, प्रभाग क्रमांक तीनमध्ये ५७८ , तर प्रभाग क्रमांक चारमध्ये ४४३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गावातील जिल्हा परिषद शाळेत एकूण चार मतदान केंद्रे असून, केंद्रनिहाय मतदानयंत्रे देण्यात आली आहेत. एक यंत्र राखीव ठेवण्यात आले आहे. महापालिका हद्दीशेजारील गजानन सोसायटी भागातील मतदारांना मतदानासाठी एक किलोमीटरहून अधिक अंतराची पायपीट करावी लागणार आहे. सांगवडे येथे जिल्हा परिषद शाळेत तीन मतदान केंद्रे असून, एकूण १०४६ मतदार हक्क बजावतील

देहूगाव : सर्व मतदान यंत्रे सुरळीत असल्याची खात्री करण्यासाठी अप्पर तहसीलदार किरणकुमार काकडे यांनी चंद्रकांत पाटील, तलाठी मिलिंद मनवर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
देहूगाव हे तीर्थक्षेत्र व मोठी ग्रामपंचायत आहे. यामध्ये १७ जागांसाठी ७५ उमेदवार रिंगणात असून, आपले नशीब आजमावत आहेत. ही ग्रामपंचायत मोठी असल्याने या निवडणुकीकडे सर्व गावातीलच नव्हे, तर तालुक्याचेच लक्ष लागले आहे. येथे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात नेमण्यात आला आहे. देहू-आळंदीवर दुतर्फा हे बूथ लावण्यात आले आहेत. बहुतेक सर्वच उमेदवारांचे वेगवेगळे बूथ जरी असले, तरी या बूथला मोठ्या मंडपाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मतदान प्रक्रियेत कोणतीही बाधा येऊ नये, यासाठी पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्यासह तीन अधिकारी, १० कर्मचारी व एक विशेष कृती दल स्थापन करण्यात आले आहे. याबरोबरच देहूगाव व माळीनगर येथील मतदान इमारतीसाठी एक सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी म्हणून नेमले आहेत. मतदानादरम्यान गावात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येत आहे किंवा नाही, यावर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. याला बाधा आणणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर त्वरित कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी सांगितले.

वडगाव मावळ : मतदान प्रक्रियेतील मतदान यंत्र व इतर साहित्याचे वाटप सोमवारी तळेगाव दाभाडे येथील पु. वा. परांजपे हायस्कूल येथे करण्यात आले. १४८ मतदान केंद्रांवरील तयारी पूर्ण झाली असून, ७४,१५९ मतदार हक्क बजावणार आहेत.
तालुक्यातील ३३२ जागासाठी ७५७ उमेदवार रिंगणात असून, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० होईल. निवडणुकीसाठी ३८,६१० पुरुष व ३५,५४९ स्त्री असे एकूण ७४,१५९ मतदार आहेत. एका मतदान केंद्रावर १ मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ शिपाई व १ पोलीस कर्मचारी असे ६ कर्मचारी नियुक्त केले आहेत. ३८ निवडणूक निर्णय अधिकारी, १८० मतदान केंद्राध्यक्ष व ५४० मतदान अधिकारी एकूण ७५८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक असे १५० पोलीस व १५० शिपाई असे एकूण १,०५८ कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली. उपअधीक्षक विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ५ , सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक १५ , कर्मचारी १२३ व गृहसुरक्षा दल जवान ५१ नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती निरीक्षक विजय जाधव यांनी दिली.
पिंपरी : शहरात स्थायिक असलेल्या, पण गावच्या मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांची ग्रामपंचायत निवडणुकीमुळे चंगळ झाली आहे. त्यांना गावाकडे नेण्यासाठी उमेदवारांनी लाखो रुपये खर्च केला आहे. खासगी वाहतूक व्यावसायिकांची दिवाळी झाली आहे.
जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर, हवेली, मुळशी, भोर, वेल्हा, मावळ आदी भागांतील नागरिक येथे वास्तव्यास आहेत. शहरातील १० ते १५ टक्के नागरिकांचे मतदान अद्यापही त्यांच्या मूळ गावी आहे. मंगळवार ४ आॅगस्टला ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या मतदानाला येण्यासाठी ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी मतदारांना वेळेत मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी नियोजन केले आहे. उमेदवारांनी शहरात राहणाऱ्या मतदारांची यादी तयार केली आहे. या यादीतील मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी व परत घरी जाण्यासाठी आलिशान गाड्यांचे नियोजन केले आहे. शहरात एकाच भागात जास्त उमेदवार असतील, तर त्यांच्यासाठी खासगी बसची आगाऊ नोंदणी केली आहे. एकाच कुटुंबातील ८-१० मतदार असतील, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था केली आहे. त्यांना हवे त्या हॉटेलमध्ये नाष्टा, दुपारी व रात्री जेवण, आकर्षक भेटवस्तू अशा सोयी उमेदवारांनी केल्या आहेत. काही उमेदवारांनी तर मतदान झाल्यानंतर मतदारांना लगेचच छोट्या सहलीचेही नियोजन केले आहे. शहरात राहणाऱ्या दूरच्या मतदारांसाठी उमेदवारांनी खासगी बस, रेल्वेची आरक्षित तिकिटे घरपोच पाठविली आहेत. तर, काही उमेदवारांकडून परतीच्या प्रवासासह होणारा सर्व भाडेखर्च घरपोच पाठविला आहे. गावात पोहोचल्यानंतर बसथांबा किंवा रेल्वे स्टेशनपासून मतदान केंद्रापर्यंत येण्या-जाण्याची सोयही केली आहे. एकाच कुटुंबातील ८-१० मतदार असलेल्यांसाठी उमेदवारांकडून मतदानाच्याच दिवशी सहलीचे आयोजन केले आहे. त्यांच्यासाठी एक स्वतंत्र गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. काही नागरिक बऱ्याच वर्षाने आपल्या मूळ गावी निवडणुकीच्या निमित्ताने जातात. याचाच फायदा घेऊन उमेदवारांकडून त्यांना मतदान झाल्यानंतर एखाद्या प्रेक्षणीय स्थळासाठी किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाठवण्याचे प्रलोभन दाखवले जाते.
पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत कामगारवर्ग मोठ्या संख्येने आहे. संपूर्ण राज्यातून या ठिकाणी लोक कामाधंद्यानिमित्त शहरात स्थायिक झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी दूरच्या ठिकाणी किंवा लांब गावाला मतदान असणाऱ्या नागरिकांनी कामावर सुटी घेतली आहे. मंगळवारी अनेक छोट्या-मोठ्या उद्योजक धंद्यामधील कामगारांनी सुटी घेतली आहे. (प्रतिनिधी)



(वार्ताहर)




(वार्ताहर)











(वार्ताहर)

Web Title: The fate of villagers will be decided today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.