अपेक्षा दमदार पावसाची

By Admin | Updated: July 9, 2015 02:36 IST2015-07-09T02:36:38+5:302015-07-09T02:36:38+5:30

पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सकाळपासून किवळे, गहुंजे, सांगवडे परिसरात पावसाच्या हलक्या व तुरळक सरींनी अधूनमधून हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Expect rainy rains | अपेक्षा दमदार पावसाची

अपेक्षा दमदार पावसाची

किवळे : पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी सकाळपासून किवळे, गहुंजे, सांगवडे परिसरात पावसाच्या हलक्या व तुरळक सरींनी अधूनमधून हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. भात व खरिपातील इतर पिकांसाठी हा पाऊस पोषक असला, तरी आणखी पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
मोठ्या विश्रांतीनंतर देहूरोड, किवळे, रावेत, मामुर्डी, गहुंजे व सांगवडे भागात बुधवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी येत होत्या. बुधवारी सायंकाळपर्यंत पडलेल्या हलक्या पावसाने भुईमूग, कडधान्ये, भातरोपांना काहीसा दिलासा दिला आहे. मध्यंतरीच्या उघडिपीने भुईमूग, घेवडा, मूग, पावटा या पिकांची पेरणी केलेले शेतकरी चिंतेत होते. नदीच्या अगर विहिरीच्या पाण्याची सोय असलेल्या काही मोजक्या शेतकऱ्यांची भातलागवड झाली असून, पाण्याची सोय नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील भातरोपे जळू लागली होती. हा पाऊस पिकांसाठी अनुकूल असला, तरी दमदार पाऊस आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रामुख्याने उशिरा भातलागवड करण्यासाठी बहुतांश शेतकरी दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
भातरोपांचे नुकसान
शिवणे : पवन मावळात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने काही शेतकऱ्यांचे भातरोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भातखाचरे कडक उन्हाने पार करपून गेली आहेत. पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहणार आहे. नदीशेजारील शेतात शेतकऱ्यांनी मोटारीच्या साहाय्याने पाणी सोडून पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)

Web Title: Expect rainy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.