अवैध धंद्यांत पोलिसांची भागीदारी, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यास बसेल चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:20 IST2017-09-23T00:20:57+5:302017-09-23T00:20:59+5:30
पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत पिंपरी-चिंचवड व शहरालगतचा ग्रामीण परिसर येतो. पोलीस मुख्यालयापासून हे अंतर ३० ते ३५ किलोमीटरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मुख्यालयातून वरिष्ठ अधिकाºयांकडून या भागातील पोलिसांवर पूर्ण नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही.

अवैध धंद्यांत पोलिसांची भागीदारी, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यास बसेल चाप
पिंपरी : पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत पिंपरी-चिंचवड व शहरालगतचा ग्रामीण परिसर येतो. पोलीस मुख्यालयापासून हे अंतर ३० ते ३५ किलोमीटरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मुख्यालयातून वरिष्ठ अधिकाºयांकडून या भागातील पोलिसांवर पूर्ण नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. याचा गैरफायदा काही पोलीस अधिकारी व कर्मचारी घेत आहेत. उद्योगनगरीच्या परिसरातील अवैध धंद्यात त्यांचे नातेवाईक व निकटवर्तीयांची भागिदारी असल्याचे गोपनीय पत्र ‘लोकमत’ कार्यालयास प्राप्त झाले आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यास बेताल पोलिसांवर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे.
‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून ताथवडे परिसरातील ‘एस्कॉर्ट’ होत असल्याचे उघडकीस आणले. वेश्या व्यवसायासाठी तरुणींची ने-आण करणाºया काळ्या काचेच्या वाहनांवर कारवाई का होत नाही? असा मुद्दा ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उपस्थित झाला होता. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसरात पुढील आठवडाभर अवैध धंद्यावर कारवाई झाली. मात्र, वेश्या व्यवसायासाठी तरुणींची ने-आण करणाºया वाहनांच्या चालकांवर गुन्हे दाखल झाले नाहीत. केवळ ताथवडेतील खुलेआम सुरू असलेला वेश्या व्यवसाय बंद झाला. ‘स्टिंग आॅपरेशन’नंतर हा प्रकार थांबल्यामुळे स्थानिक नागरिक व शिक्षण संस्था चालकांनी लोकमतचे आभार मानले. दरम्यानच्या काळात पोलिसांशी संबंधितांनी पत्र पाठवून ‘लोकमत’ला गोपनीय माहिती कळवली. त्यामध्ये अवैध धंद्यात काही पोलीस अधिकारी व कर्मचा-यांची कशी भागिदारी आहे, हे नमूद केले आहे.
अवैध वाहतुकीत भागिदारी
विशेष म्हणजे ताथवडेमध्ये वेश्याव्यवसायासाठी तरुणींची ने-आण करणाºया ज्या मोटारी होत्या, त्या काही पोलिसांनी दुसºयाचे नाव पुढे करून उपलब्ध करून दिलेल्या होत्या. युनिट १ आणि २च्या काही पोलीस अधिकाºयांची त्यात अप्रत्यक्ष भागीदारी होती. पुण्यातील दहशतवादी पथकातील दोन अधिकाºयांची वाहने त्यात होती. मुंबईला बदली झालेल्या एका पोलीस अधिकाºयाचीही मोटार ताथवडेतील रस्त्यावर एस्कॉर्टसाठी धावत होती. पोलिसांचीच भागीदारी असल्यामुळे मोटारचालकांवर गुन्हे दाखल झाले नाहीत. शिवाय वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाºयांच्या सहकार्याने अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट कार्यरत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
>आयुक्तांच्या आदेशानंतरही अवैध धंदे
लोकमतने स्टिंग आॅपरेशनद्वारे ताथवडेतील सेक्स रॅकेटचा भांडाफोड केल्यानंतर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस अधिकाºयांना तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील लॉजवर छापे टाकून तरुणींची सुटका केली. एक थेंबही बेकायदा मद्यविक्री होता कामा नये, अशा शब्दांत त्यांनी अधिकाºयांना सुनावले होते. एक थेंबही अवैध मद्यविक्री नको, याचा अर्थ कोणाचीही गय करू नका, कसलेच बेकायदा धंदे आपल्या हद्दीत असू नयेत, असा त्यामागील अर्थ असताना केवळ पोलिसांच्या आशीर्वादाने काही अवैध धंदे सुरू आहेत.
जाणीवपूर्वक डोळेझाक
कालिया नावाचा एक इसम हे रॅकेट चालवतो, असे पत्रात नमूद आहे. मटका, जुगार अड्डे अशा बेकायदा धंद्याकडे पोलीस जाणीवपूर्वक डोळेझाक करतात, त्यामागील गौडबंगाल हेच आहे. काही राजकारण्यांना, गुन्हेगारांना हाताशी धरून पोलिसांच्या वरदहस्ताने हे धंदे सुरू आहेत. मटका अड्डे आॅनलाइन झाले आहेत. पोलिसांना याबद्दल माहिती नाही, असे नाही. मात्र तरी कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अवैध धंदे करणाºयांकडे दुर्लक्ष करून रात्री उशिरापर्यंत चहा, नाष्टा विक्री करणारे, अन्य छोटे व्यवसायिक यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केल्याचे भासवले जाते. मात्र, मोठ्या अवैध धंद्याकडे दुर्लक्ष केले जाते.