संरक्षण उद्योग सक्षम करा
By Admin | Updated: April 21, 2016 00:41 IST2016-04-21T00:41:09+5:302016-04-21T00:41:09+5:30
परेदशातून साहित्याची खरेदी बंद करून संरक्षण उद्योग सक्षम करून तेथेच त्याची निर्मिती करावी. यामुळे देशात रोजगार वाढून बेरोजगारी कमी होईल

संरक्षण उद्योग सक्षम करा
खडकी : परेदशातून साहित्याची खरेदी बंद करून संरक्षण उद्योग सक्षम करून तेथेच त्याची निर्मिती करावी. यामुळे देशात रोजगार वाढून बेरोजगारी कमी होईल, असे मत भारतीय मजदूर संघाचे (बीएमएस) राष्ट्रीय अध्यक्ष बैद्यनाथ राय यांनी केले आहे.
भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे १७वे त्रैवार्षिक अधिवेशन खडकीतील आलेगावकर विद्यालयात बुधवारी सुरू झाले. उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संघाचे उपाध्यक्ष के. एन. शर्मा, साधू सिंह, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे अध्यक्ष नरेंद्र तिवारी, सचिव एम. पी. सिंह, देहूरोड आॅर्डनन्स फॅक्टरीचे सरव्यवस्थापक आर. के. तिवारी, संजय श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
राय म्हणाले, ‘‘राष्ट्रीय हित लक्षात घेऊन संरक्षण उद्योगात देशी उत्पादनास चालना दिली जावी. राष्ट्र सक्षम झाले, तर कामगार स्वावलंबी होतील. देशभक्तीवर आधारित समाज घडविण्याचे कार्य संघटना करीत आहे.’’ सध्या सुरू असलेल्या ‘भारतमाता की जय’चा वादावर ते म्हणाले, ‘‘कम्युनिस्ट पक्षाची विचारधारा रशिया व चीन येथील कामगार चळवळीच्या विचारधारेशी मिळतीजुळती आहे. कम्युनिस्ट विचारधारा अंगीकारल्याने त्यांची देशातील विचारधारेच्या प्रवाहाच्या विरोधात भूमिका दिसून येते.
बापट म्हणाले, ‘‘केंद्र सरकार कामगार प्रश्नांबाबत सकारात्मक आहे. अनुकंपा आधारित जाचक अटी शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सातवे वेतन आयोग लवकरच लागू केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नियोजनामुळे यापुढे कामगारांना त्यांच्या हक्कासाठी लढावे लागणार नाही. चर्चा करून अनेक प्रश्न सोडवले जातील. संरक्षण क्षेत्रात काम करणारे कामगार हे सीमेवर लढणाऱ्या सैनिकांइतकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधिल आहोत.’’
नरेंद्र तिवारी म्हणाले, ‘‘पुण्यातील सांस्कृतिक भूमीत होणारे हे अधिवेशन राष्ट्राला नवी चालना देणारी आहे. देश अधिकाधिक मजबूत होण्याचे काम अधिवेशनातून होणार आहे.’’ (प्रतिनिधी)