शहरात वीजचोरी कायमच, कारवाई नाममात्र
By Admin | Updated: November 2, 2015 00:44 IST2015-11-02T00:44:35+5:302015-11-02T00:44:35+5:30
वीजमीटरमध्ये फेरफार करून वीज वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या शहरात अधिक आहे. उघड्या तारा आणि डीपी बॉक्समधून वीजजोड घेण्याचे प्रमाण लक्षणीय आहे

शहरात वीजचोरी कायमच, कारवाई नाममात्र
पिंपरी : वीजमीटरमध्ये फेरफार करून वीज वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या शहरात अधिक आहे. उघड्या तारा आणि डीपी बॉक्समधून वीजजोड घेण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. वीजचोरी सर्रासपणे होत असतानाही केवळ मोजक्याच ग्राहकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यातही थोड्याच ग्राहकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातात. मात्र, यामध्ये गुंतलेले वीजवितरण कंपनीचे कर्मचारी मात्र नामानिराळे राहतात.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे पिंपरी आणि भोसरी असे दोन विभाग आहेत. या विभागांद्वारे संपूर्ण शहरासह देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि मावळ ताुलक्यातील काही गावांत वीजपुरवठा केला जात आहे. एकूण ३ लाखांच्या वर ग्राहकसंख्या आहे. औद्योगिक, शेतकरी, व्यापारी आणि घरगुती अशा वर्गांनुसार विजेचा पुरवठा होतो.
वीजमीटर संचातील सीटी यंत्रणेत फेरफार करून सीटी यंत्रणा गायब केली जाते. मीटरमध्ये काही तांत्रिक बदल केले जातात. यामुळे वापरलेल्या विजेची नोंद होत नाही किंवा कमी प्रमाणात होते. मीटर संथ केल्याने वापरलेल्या विजेपेक्षा कमी नोंद (रीडिंग) होते. त्याचबरोबर उघड्या तारा आणि डीपीमधून थेट वीजजोड घेऊन वापरली जाते.
वीज कंपनीने कारवाई दरम्यान वीजमीटर जोड तोडल्यानंतरही अनधिकृतपणे वीज वापरत असल्याचे दिसते. काही भागांत भाडेकरु, सदनिका आणि खोलीधारकांना भाड्याने वीज दिली जाते. या पद्धतीने विजेची परस्पर विक्री केली जाते. हातगाडी आणि पथारीविक्रेत्यांना काही मंडळी वीजपुरवठा करतात.
काही भागांत वीज कर्मचारी या प्रकारे मीटरमध्ये फेरफार आणि अनधिकृत वीजजोड करून देतात. त्या मोबदल्यात महिन्यास ठराविक मोबदला घेतला जातो. त्यामुळे अनेक ग्राहकांना क्षुल्लक रकमेचे वीज बिल येते. काही कर्मचारी हे काम बिनधास्तपणे करीत आहेत. कारखाने, लघुउद्योग, दुकान आणि घरातही वीजचोरी केली जात असल्याचे चित्र आहे. भोसरी एमआयडीसीतील एका कारखान्यावर गेल्या महिन्यात वीज चोरीप्रकरणी कारवाई केली गेली. मामुर्डी येथील आइस फॅक्टरीत असा प्रकार उघड केला गेला.(प्रतिनिधी)