कार्यकर्त्यांमध्ये संचारली निवडणूक
By Admin | Updated: September 13, 2014 05:35 IST2014-09-13T05:35:45+5:302014-09-13T05:35:45+5:30
आचारसंहिता लागू होण्याअगोदरच काही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागू होणार, निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यानंतर प्रचार करायचा झाल्यास वेळ कमी पडतो

कार्यकर्त्यांमध्ये संचारली निवडणूक
पिंपरी : आचारसंहिता लागू होण्याअगोदरच काही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागू होणार, निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यानंतर प्रचार करायचा झाल्यास वेळ कमी पडतो हा पूर्वानुभव लक्षात घेऊन काही उमेदवारांनी वैयक्तिक पातळीवर प्रचारास सुरुवात केली आहे. विविध विकासकामे केल्याचे सांगण्यासाठी जोरदार फलक युद्ध रंगले. प्रचाराचे नियोजन करून एक महिन्यापासूनच वाहने फिरू लागली आहेत. सोशल मीडियावर विविध कार्यक्रम, उपक्रमांची माहिती पोहोचविण्याचे काम जोरात सुरू आहे. काही उमेदवारांनी तर मतदारांचा कौल जाणून घेण्यासाठी खासगी संस्थांना तातडीने सर्वेक्षणाचे काम दिले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार विलास लांडे यांनी अपक्ष लढून ५० हजार ४७२ मते मिळवली होती. युतीच्या सुलभा उबाळे यांना ४९ हजार २०० मते मिळाली होती. राष्ट्रवादीच्या मंगला कदम यांना तिसऱ्या क्रमांकाची २६ हजार ७९८ मते मिळाली होती, असे चित्र मागील निवडणुकीत भोसरी मतदारसंघात होते. नगरसेविका उबाळे, शहर संघटक विजय फुगे इच्छुक आहेत. मोदी लाटेचा फायदा होईल या अपेक्षेने भाजपचे एकनाथ पवार यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात विद्यमान आमदार लांडे यांना टक्कर देण्यास स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे तयार झाले आहेत. त्यांच्यात निवडणुकीनिमित्ताने शीतयुद्ध सुरू आहे. राष्ट्रवादीचे नाना लोंढे, आनंदा यादव, एकनाथ थोरात, पंडित गवळी, दत्ता साने यांनीही मुलाखत दिली आहे. मनसेकडून लोकसभेपूर्वी शिवसेनेतून दाखल झालेले उमेश चांदगुडे यांच्यासह मनसेचे नगरसेवक राहुल जाधव उमेदवारी मागत आहेत.