दुप्पट खर्च होऊनही काम अर्धवट
By Admin | Updated: November 11, 2015 01:24 IST2015-11-11T01:24:03+5:302015-11-11T01:24:03+5:30
लोणावळा नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे काम गेली सहा वर्षे सुरू आहे. अपेक्षेपेक्षा दुप्पट खर्च आजवर होऊनही पुरेशा निधीअभावी काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

दुप्पट खर्च होऊनही काम अर्धवट
लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे काम गेली सहा वर्षे सुरू आहे. अपेक्षेपेक्षा दुप्पट खर्च आजवर होऊनही पुरेशा निधीअभावी काम पूर्ण होऊ शकलेले नाही.
बाजारभागातील नूतन प्रशासकीय इमारत उभारणीच्या कामाला २००९मध्ये सुरुवात झाली़ पावसाळा वगळता २४ महिन्यांत हे काम पूर्ण होणार होते. मात्र, तसे न झाल्याने या इमारतीचा खर्च दुप्पट झाला असून, काम अद्याप अर्धवट आहे़ ६ वर्षांपासून हे काम निधीअभावी धिम्या गतीने सुरू आहे़ ३७२४ चौरस मीटरचे हे काम असून, इमारतीला तळमजला अधिक तीन मजले अशी रचना आहे़ याकरिता ९ कोटी ५६ लाख रुपये खर्च अपेक्षित धरला होता़ प्रत्यक्ष आतापर्यंत १० कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. फर्निचर कामासाठी शासनाने वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून ४ कोटी ६५ लाखांचा निधी द्यावा, अशी मागणी नगर परिषदेने केली आहे़ यासह रंगरंगोटी व अन्य कामे शिल्लक आहेत़ शासनाने आतापर्यंत या इमारतीच्या कामासाठी केवळ २ कोटी ८० लाख रुपये एवढाच निधी दिल्याने नगर परिषद स्वबळावर हे इमारत उभारणीचे काम करत आहे़ निधीअभावी २४ महिन्यांत पूर्ण होणारे हे काम ६ वर्षांनंतरही अर्धवट राहिले आहे़ निधीअभावी काम रेंगाळले आहे़
प्रशासकीय इमारतीच्या कामाकरिता कार्यालय तुंगार्ली येथे हलविले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करून तुंगार्ली कार्यालयात जावे लागते़ याकरिता तातडीने या इमारतीचे काम पूर्ण करून ती कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत़(वार्ताहर)