वर्षाविहारामुळे लोणावळ्याचे अर्थचक्र गतिमान

By Admin | Updated: July 25, 2016 01:03 IST2016-07-25T01:03:02+5:302016-07-25T01:03:02+5:30

जुलैच्या पहिल्या दिवसापासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पर्यटननगरी लोणावळ्याची मंदावलेली व्यावसायिक अर्थचक्रे वेग घेऊ लागली.

Due to rainy season the lonelial earthquake is fast | वर्षाविहारामुळे लोणावळ्याचे अर्थचक्र गतिमान

वर्षाविहारामुळे लोणावळ्याचे अर्थचक्र गतिमान

विशाल विकारी,  लोणावळा
जुलैच्या पहिल्या दिवसापासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पर्यटननगरी लोणावळ्याची मंदावलेली व्यावसायिक अर्थचक्रे वेग घेऊ लागली. तीन वर्षांत प्रथमच आर्थिक घडी व्यवस्थित बसत असल्याने व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, नगर परिषद आणि राज्य शासनाकडून अपेक्षित सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने ही पर्वणी पूर्णपणे साधता येत नसल्याचेही वास्तव समोर आले आहे.
पुणे व मुंबईतील पर्यटकांसाठी घाटमाथ्यावरील थंड हवेचे व पावसाळी पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून लोणावळा ओळखले जाते. शहराची अर्थव्यवस्था पर्यटकांवरच अवलंबून आहे. पावसाळ्यात दर वर्षी मोठ्या संख्येने पर्यटक आले, तर बाजारपेठेत सुगी असते. या वर्षी जून महिन्यात पाऊस न झाल्याने महिनाभर पर्यटकांची संख्या रोडावली होती. मागील वर्षीही अपेक्षेपेक्षा कमी पाऊस आणि पावसाळ्यात वारंवार द्रुतगती मार्गावर दरडी पडण्याच्या घटना घडल्याने लोणावळ्याची अर्थव्यवस्था अडचणीत आली होती. या वर्षी
पुन्हा मागील वर्षाचीच पुनरावृत्ती होणार, अशी चिंता प्रारंभी वाटत होती. पण, ती जुलैमधील दमदार पावसाने दूर केली.
साधारण जुुलैच्या पहिल्या आठवड्यातच शहरात मोठ्या संख्येने पर्यटकांची वर्दळ वाढली. त्यामुळे चिक्की उत्पादक-विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, रिक्षा व टूरिस्टचा व्यवसाय करणारे, पर्यटनस्थळे, शहर, तसेच राष्ट्रीय महामार्गावरील लहान-मोठी हॉटेल, फास्ट फूड, वडापाव, चहाविक्रेते, भाजीविक्रेते आदी सर्वांचाच व्यवसाय वाढल्याने लोणावळ्याच्या अर्थकारणावर चांगला परिणाम झाला आहे. भुशी धरण व इतर पर्यटनस्थळांवर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचा उदरनिर्वाह हा पावसाळ्यात चार महिने होणाऱ्या पर्यटन व्यवसायावर वर्षभर सुरू असतो.

Web Title: Due to rainy season the lonelial earthquake is fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.