ठेकेदारामुळे नागरिकांच्या घशाला कोरड

By Admin | Updated: April 19, 2016 01:00 IST2016-04-19T01:00:31+5:302016-04-19T01:00:31+5:30

पिंपरी-चिंचवड शहरात अगोदरच १५ टक्के कपात आहे. त्यातच दोन दिवसांपासून शहराच्या अनेक भागात पाणीच आले नसल्याने आणखीणच ओरड वाढली

Due to the contractor, it is dry and dry | ठेकेदारामुळे नागरिकांच्या घशाला कोरड

ठेकेदारामुळे नागरिकांच्या घशाला कोरड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात अगोदरच १५ टक्के कपात आहे. त्यातच दोन दिवसांपासून शहराच्या अनेक भागात पाणीच आले नसल्याने आणखीणच ओरड वाढली. देहूरोड-कात्रज मार्गावरील नदीवर पूल बांधणाऱ्या ठेकेदाराने कोणाचीही परवानगी न घेता नदीत बांध टाकला. यामुळे पाणी अडल्याने रावेतमधील जलउपसा केंद्रापर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. विशेष म्हणजे या बांधाबाबत पाटबंधारे विभागाला माहिती नव्हती, की महापालिकेला कल्पना नव्हती. त्यामुळे अगोदरच पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या शहरवासीयांना गेले दोन दिवस पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना नदीतून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी रावेत येथे बंधारा
उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्याजवळ महापालिकेने जलउपसा केंद्र उभारले आहे. बंधाऱ्यातून पाण्याचा उपसा केल्यानंतर निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर शहराच्या विविध भागात जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. (प्रतिनिधी)
४शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सध्या केवळ तीस टक्के पाणीसाठा आहे. यामुळे शहरात पंधरा टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. दिवसातून एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना शहरवासीयांना कसरत करावी लागत आहे. अशातच शनिवार, रविवार आणि सोमवारी सकाळी एकवेळदेखील पाणीपुरवठा झाला नाही. संपूर्ण शहरात पाण्याबाबत ओरड सुरू झाली. नागरिक नगरसेवकांकडे विचारणा करीत होते. तर नगरसेवक अधिकाऱ्यांकडे विचारणा करीत होते. आमच्या भागात पाणी आले नाही, अशी तक्रार नगरसेवक अधिकाऱ्यांकडे करीत होते.
४याबाबत सोमवारी रावेत येथील जलउपसा केंद्र येथे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. पाणीटंचाई कशामुळे निर्माण झाली, यावर चर्चा करण्यात आली. जलउपसा केंद्रापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली. त्यांच्याकडून नेहमीप्रमाणे पवना धरणातून पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर धरणातून पाणी सोडले असतानाही जलउपसा केंद्रापर्यंत पोहोचले नसल्याचे समोर आले. धरणातून सोडलेले पाणी बंधाऱ्यापर्यंत का येत नाही, याचा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध सुरू केला. रावेत येथील बंधाऱ्यापासून वरील बाजूस पाहणी केली. त्यामध्ये पुनावळेजवळील पुलाजवळ मातीचा बांध घातल्याचे निदर्शनास आले.
पुलाच्या कामासाठी पुनावळेजवळील नदीपात्रात बांध घालून पाणी अडविण्याबाबतची कसलीही कल्पना महापालिका तसेच पाटबंधारे विभागाला देण्यात आली नव्हती. या बांधामुळे जलउपसा केंद्रापर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे पाण्याचा उपसा कमी प्रमाणात होत होता. त्याचा परिणाम शहरातील पाणी वितरणावर झाला. आता हा बांध हटविण्यात आला असून, मंगळवार सकाळपासून सुरळीत पाणीपुरवठा होईल.
- प्रवीण लडकत,
कार्यकारी अभियंता, पिं.चिं. मनपा

Web Title: Due to the contractor, it is dry and dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.