कुत्र्यांच्या भीतीने रात्र काढली झाडावर
By Admin | Updated: July 22, 2015 03:10 IST2015-07-22T03:10:53+5:302015-07-22T03:10:53+5:30
: मध्यरात्रीची वेळ.., पंचवीस ते तीस कुत्री मागे लागलेली..., त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी तरुण चक्क झाडाच्या बुंध्यावर जातो...,

कुत्र्यांच्या भीतीने रात्र काढली झाडावर
तळेगाव स्टेशन : मध्यरात्रीची वेळ.., पंचवीस ते तीस कुत्री मागे लागलेली..., त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी तरुण चक्क झाडाच्या बुंध्यावर जातो..., झाडाखालून कुत्री हटत नाहीत. याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार कराऱ्याला गेल्यानंतर प्रशासनाने त्या तरुणाकडे पन्नास जणाच्या सह्याचे निवेदन मागितले. वरकरणी ही गोष्ट एकाद्या चित्रपटातील वाटेल, पण ही तळेगावमध्ये घडलेली सत्य घटना आहे.
तळेगावात राहणारा जितेंद्र कुस्ते (वय ३३) हा तरुण शनिवारी रात्रपाळीवरून घराकडे जात असताना स्टेशन ते जिजामाता चौकदरम्यान मेथॉडिस्ट शाळेजवळ त्याला सात-आठ कुत्र्यांनी गाठले व पाठलाग केला. भीतीपोटी तो झाडावर चढला. कुत्र्यांनी झाडाच्या बुंध्याशी ठाण मांडल्याने ती काही हटायला तयार होइनात. बिचारा रात्री ११.४५ ते ३ वाजेपर्यंत पहाटे झाडावरच बसून राहिला. नंतर कुत्री पांगल्याने कसेबसे ध्यान चुकवत धापा टाकत घर गाठले.
दुसऱ्या दिवशी या संदर्भात कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी तक्रार करायला गेला असता, तेथील कर्मचाऱ्यांनी ४०-५० लोकांच्या सह्यांसह निवेदनाचा सल्ला देऊन परतवून लावले.
सोमाटणे फाटा व खिंड परिसरात मोकाटे कुत्रे आणून सोडतात. तीच कुत्री प्रामुख्याने तळेगावात येऊन उच्छाद मांडत असल्याचे बोलले जाते.
मागे ५-६ महिन्यांपूर्वी पालिकेने बाहेरचे सराईत कुत्रे पकडणारे व पिंजरे आणून, काही कुत्री पकडून नेली होती. पालिकेकडे जरी स्वत:ची सामग्री नसली, तरी बाहेरच्या ठेकेदाराला बोलावून या मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. यावर प्रतिक्रियेसाठी तळेगाव नगर परिषदेत संपर्क साधला असता, कुणीही उपलब्ध होऊ शकले
नाही.(वार्ताहर)